लंडन किड्स प्री स्कूलच्या बाल वारकऱ्यांनी वेधले लक्ष
नगर (प्रतिनिधी)- केडगाव मध्ये ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित लंडन किड्स प्री स्कूलचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दिंडीत श्री विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मिराबाई , मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत असलेल्या दिंडीतील चिमुकल्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठु नांमाच्या जय घोषात,पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे ध्वज घेतलेले विद्यार्थी उत्स्फुर्तपणे दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले ते बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा. शाळेपासून शाहूनगर बस स्टॉप मार्गे माधवनगर मधील विठ्ठल मंदिर पर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेतले होते.
साधु संत येता घरी, तोचि दसरा दिवाळी, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, चला गजर करूया विठु माऊलीचा!, रुजवू मराठी फुलवू मराठी! चला बोलू मराठी, बेटी बचाव बेटी पढाव, एक पाऊल स्वच्छतेकडे या आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी झलकवले. दिंडीत विद्यार्थ्यांसह पालक देखील सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायची माहिती सांगण्यात आली. उमा भोर व राजेंद्र भोर यांच्याकडून दिंडीतील बाल वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
दिंडीचे प्रारंभ श्री विठ्ठल रुख्मिणी मूर्तिचे पूजन करून करण्यात आले. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून पालखीची पूजा केली. कार्यक्रमासाठी संस्थचे सचिव संदीप भोर, खजिनदार प्रसाद जमदाडे, मुख्याध्यापिका रुचिता जमदाडे, सुप्रिया मुळे, कल्याणी शिंदे, सपना साबळे, प्रतिभा साबळे, जयश्री साठे, स्मिता गोवर्धन, वाळेकर मावशी, गोंदके मावशी आदींसह पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.