कारवाई करण्याचे वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन मिळत नसल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर तालुक्यातील मौजे रांजणी गावात रेशनिंगचे धान्य वेळेत व ऑनलाईन पध्दतीने मिळत नसल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रामस्थांसह शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर रेशन दुकानदारावर कारवाई करुन ग्रामस्थांना वेळेत ऑनलाईन पध्दतीने धान्य उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तालुका अध्यक्ष रविकिरण जाधव, सल्लागार जे.डी. शिरसाठ, सुधीर ठोंबे, राजीव भिंगारदिवे, आतिफ शेख, अशोक लिपाने, संतोष उन्हाळे, काशिनाथ जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
मौजे रांजणी गावात रेशन धान्य दुकानदाराला दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धान्य प्राप्त होत आहे. मात्र तो दुकानदार शेवटच्या दोन दिवसात धान्याचे वितरण करतो. गावात इंटरनेटची रेंज असून, देखील ऑफलाइन पद्धतीने धान्याचे वितरण केले जात आहे. या प्रकरणी दुकानदाराला विचारल्यास उडवाउडवीचे उत्तर देऊन, तो सरपंच व ग्रामस्थांनी ऑफलाइन वाटप करण्याची परवानगी दिली असल्याचे तो सांगत आहे. अनेकवेळा धान्य वाटप करताना स्वतः दुकानदार देखील हजर राहत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
रांजणी गावातील रेशनिंगच्या सदर दुकानावर कारवाई करुन नियमित धान्य पुरवठा करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.