शासन आपल्या दारी उपक्रमाचा ग्रामस्थांनी घेतला लाभ
महसूल व कृषी योजनांचा लाभ देऊन विविध दाखले वाटप
नगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील स्वस्तिक मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी सुधीरजी पाटील आणि तहसीलदार संजयजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या वतीने हे शिबिर पार पडले. या शिबिराला नेप्ती मंडळातील सर्व गावांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला.
या शिबिरात नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलिअर दाखला अशा महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांना शिक्षण, नोकरी व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महसूल विभागासह कृषी विभाग, समाजकल्याण विभाग, आणि संजय गांधी निराधार योजना विभागाने देखील या शिबिरात सहभाग नोंदवला. नागरिकांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, महाडीबीटीवरील योजनांद्वारे फळबाग लागवड आणि शेतीसाठी अनुदान मिळवून देण्यात आले.
या शिबिराप्रसंगी माजी जि.प. सदस्य अरुण होळकर, बी.आर. कर्डिले, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, रामराव कांडेकर, अनिल पवार, पांडुरंग कळमकर, अमोल चौगुले, अमोल औटी, सूरज पवार, सुभाष नेमाने ,बाळासाहेब काळे, मंगल कांडेकर, शिवांजली कांडेकर, प्रकाश कांडेकर, लक्ष्मण कांडेकर, हौशीराम जपकर, गणेश वाळके, अभिजित शेटे, शिवाजी होळकर, परिसरातील गावचे सर्व सरपंच, नायब तहसीलदार गणेश भानवसे, नेप्ती मंडळअधिकारी प्रताप कळसे, नेप्ती मंडळातील तलाठी संतोष पाखरे, दिपक झेंडे, विनायक दिक्षे, सुवर्णा रांधवण, रुपाली म्हस्के, दिपाली विधाते, संजय गांधी शाखेचे महसूल सहायक विक्रम सदाफुले, श्रीमती बुरा, कृषी सहाय्यक रावसाहेब नवले, रमेश खाडे, तसेच ग्रामसेवक अनुजा लाकूडझोडे तसेच सर्व गावातील कोतवाल, सेतू केंद्र संचालक उपस्थित होते.
एकाच छताखाली अनेक सेवा ही संकल्पना या शिबिराच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवली गेली. नागरिकांना विविध खात्यांची कार्यालये न फिरता, एकाच ठिकाणी सेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.