• Wed. Jul 2nd, 2025

जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण देण्याची मुस्लिम समाजाची मागणी

ByMirror

Jun 25, 2025

मोठा जमाव जमवून दर्गा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप


25 व 26 जून रोजी जमाव घेऊन दर्गावर येणाऱ्यांना रोखावे; जिल्हाधिकारी यांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा उर्फ कान्होबा येथे बेकायदेशीरपणे काही विघ्नसंतोषी लोक एकत्र येऊन धार्मिक द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने गैरकृत्य करणार असल्याने त्यांना रोखण्याची मागणी जवखेडे खालसा मधील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. दर्गात येऊन मुजावर यांना धमकावून आरती करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व कोणतीही विपरीत घटना घडणार नाही, यासाठी प्रशासनाने योग्य भूमिका घेण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.


पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे पीर बाबा रमजान दर्गा उर्फ कान्होबा आहे. या दर्गाच्या दिवा बत्तीसाठी मुस्लिम समाजाला पिढ्यानपिढ्या दीडशे वर्षापासून इनामी जमिनी मिळालेली आहे. शासनाच्या गॅजेटमध्ये देखील तसा उल्लेख असून, ॲलिनेशन रजिस्टरला याबाबतची नोंद आहे.


परंतु गावातील काही विघ्नसंतोषी लोक यामध्ये राजकारण करून तीन वर्षापासून दर्गावर येऊन दमबाजी करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, मुस्लिम समाजातील मुजावर यांना सदर दर्गातून शिवीगाळ करून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक गुरुवारी सकाळी दर्गावर येऊन आरती करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समाजाचे मुजावर यांना दमबाजी करुन दर्गा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावात मुस्लिम समाज अल्प असून, त्यांच्यात भीतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येत आहे. दर्गावर असलेला हिरवा झेंडा काढून, मजारवर भगवी चादर टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.


या दर्गावर कधीही आरती झालेली नसून, दर्गावर आरती करण्याच्या उद्देशाने चिथावणी देऊन जमाव जमविण्याचा प्रयत्न सुरु आहे. 19 जून रोजी दर्गातील मुजावर यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजाची बैठक घेतली, मात्र मुस्लिम समाजावर दबाव टाकण्यात येत आहे. जातीय द्वेष पसरविण्यासाठी युवकांचे माथी भडकविण्याचे काम सुरु आहे. प्रशासन देखील यासंदर्भात सहकार्य करत नसून, विघ्नसंतोषी लोक दर्गाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा येथे जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. यासाठी विघ्नसंतोषी लोकांना गैरकृत्य करण्यापासून रोखण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी भैय्या शेख, शाहिद पठाण, परवेज अशरफी, फिरोज शेख, हुसेन शेख, शफिक शेख, शाकीर शेख, असिफ शेख, इरफान शेख, अन्वर शेख, आदींसह गावातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *