भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात महिलांच्या पुढाकाराने झाडांची लागवड
स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक मुक्तीचा संदेश
वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य -भारती कटारिया
नगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशन लेडीज विंगच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात वृक्षारोपण अभियान राबवण्यात आला. पर्यावरण रक्षण व हरित शहराचा संदेश देत महिलांनी पुढाकार घेऊन विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. तर परिसरात स्वच्छता अभियान राबवून पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला.

या उपक्रमाचा प्रारंभ फाउंडेशनच्या कार्यकारिणी संचालिका भारती रविंद्र कटारिया यांच्या हस्ते वृक्षारोपणाने करण्यात आला. यावेळी रत्ना कटारिया, केतकी कटारिया, कोमल कटारिया, अनुष्का कटारिया,पूनम कटारिया, अर्चना कटारिया, स्नेहल कटारिया, आरती कटारिया, साधना कटारिया, दिपाली कटारिया, गुलाबबाई कटारिया, श्रेया कटारिया आदी महिला सदस्या व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारती कटारिया म्हणाल्या की, वृक्षारोपण हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घराभोवती, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणी झाडे लावली, तर संपूर्ण समाज हरित व प्रदूषणमुक्त होईल. महिलांनी पुढाकार घेऊन या सामाजिक चळवळीत हातभार लावण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे कटारिया म्हणाल्या की, प्रदूषण, तापमानवाढ, जलसंकट या संकटांचा मुकाबला करण्यासाठी वृक्षारोपण हे अत्यंत प्रभावी व सुलभ उपाय आहे. आज आपण झाडे लावतोय, ती उद्या आपल्या पुढील पिढ्यांचे रक्षण करतील. प्रत्येक स्त्रीने एका हरित माताची भूमिका स्वीकारून अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. आपल्या परिसराची जबाबदारी आपलीच आहे, म्हणूनच आजच्या स्वच्छता मोहिमेद्वारे आम्ही प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षारोपणासोबत स्वच्छता व प्लास्टीक मुक्ती आवश्यक असल्याचे ते म्हणाल्या.
या उपक्रमातून महिला सदस्यांनी कर्तव्यभावना व पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. तर सर्व समाजातील महिलांना या चळवळीत सहभागी करुन घेण्याचा संकल्प उपस्थित महिलांनी व्यक्त केला.