पेन्शनवाढसाठी सर्व पेन्शनर्सनी एकजुट व्हावे -बाळासाहेब देशमुख
नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय संघर्ष समिती (ईपीएस 95) अहिल्यानगर शहर कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते त्रिंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. शहरात झालेल्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
देशातील विविध खाजगी व शासकीय औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 78 लाख पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढीसाठी गेले आठ ते नऊ वर्षापासून देशभरात संघटना कार्यरत आहे. शहरात झालेल्या बैठकीत देशमुख यांच्या नावाची सूचना संघटनेचे पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांनी मांडली. त्यास अमित घाडगे महाराष्ट्राचे प्रांतीक संघटक यांनी अनुमोदन दिले. सभेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब वाळके होते. याप्रसंगी दिलीप कहाने, राजगुरु, संपतराव समिंदर, आशाताई शिंदे, प्रकाश गायके, भिमराव भिसे, डॉ. गाडेकर, प्रकाश मुरुमकर, शिवाजी थोरात, महादेव शिंदे, बबनराव खामकर आदी उपस्थित होते.
पेन्शनवाढची मागणी मान्य होण्यासाठी सर्व पेन्शनर्सनी एकजुट व्हावे. शहरातील जास्तीत जास्त पेन्शनर्स यांनी संघटनेचे सभासद होऊन संघटना बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन नवनियुक्त शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी केले. संघटनेचा शपथ ग्रहण कार्यक्रमाने सभेची सांगता झाली.