विद्यार्थी, युवक-युवतींनी केली योगासने
नियमित योगाद्वारे सक्षम सदृढ पिढी घडणार -पै.नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयाच्या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. योग दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी, युवक-युवती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या योग शिबीरात उद्योजक तथा योग शिक्षक पतंजलीचे योग शिक्षक गणेश मोकासे व दत्तात्रय गारगुंडे यांनी उपस्थितांना योग व प्राणायमाचे धडे दिले. विविध आसन प्रात्यक्षिकासह करुन, त्याचे महत्त्व विशद केले. तर योग, प्राणायम व ध्यान धारणेबद्दल माहिती देवून निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना सकस आहाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, मंदा साळवे, मिरा थिटे, प्रमोद थिटे, तुकाराम पवार, तृप्ती वाघमारे, निकिता शिंदे-रासकर, दिपाली ठाणगे आदी उपस्थित होते.
पै.नाना डोंगरे यांनी निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम महत्त्वाचा आहे. गावाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम व योग करण्याची गरज आहे. निरोगी जीवनासाठी भारताने संपूर्ण जगाला योगाची देणगी दिली असून, योगाने सक्षम सदृढ पिढी निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सचिव सुमन कुरेल, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, ग्रंथालय विभागाचे राज्य संचालक अशोक गाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.