कुटुंबीयांसह महिलेचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण
जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करुन खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करुन गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एसटी वाहकावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पिडीत महिलेच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण केले. तर एसटी वाहकाच्या तक्रारीवरुन खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या उपोषणात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, रंजना घाडगे, प्रियंका घाडगे, रामदास ससाणे, विजय डाडर, त्रिंबक साळवे आदी सहभागी झाले होते.
रंजना घाडगे आपल्या मुलीसह काष्टी येथे नातेवाईकांकडून पुण्याला जात असताना. कर्जत-स्वारगेट (पुणे) एसटीने प्रवासासाठी गाडीत बसण्यासाठी चढले. मात्र मुलगी प्रियंका घाडगे ही गाडीत चढत असताना कंडक्टरने दरवाजा ओढल्याने तिचा पाय दरवाज्यात अडकल्याने ती एसटीने 30 ते 40 फूट फरफटत ओढली गेली. हा प्रकार पाहून रस्त्यावरील अज्ञात लोकांनी संतप्त भावनेने गाडी थांबवून वाहकाला मारहाण केली. त्या मधील कोणतेही व्यक्ती ओळखीचे नव्हते. मात्र एसटी वाहन याने महिलेचा भाऊ राजू डाडर व इतर चार व्यक्तींवर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खोटी तक्रार दाखल केल्याचे म्हंटले आहे.
तर एसटी वाहकाने केलेली मारहाण, लज्जा उत्पन्न होईल केलेले वर्तन आणि मंगळसूत्र ओढल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे सांगितलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल करुन घेण्यात आले नाही. ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्यात आला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
एसटी वाहकाने खोटा गुन्हा दाखल केला असून, सांगितलेल्या जबाबावरुन तक्रार दाखल करुन न घेणारे संबंधित पोलीसांची चौकशी करुन कारवाई करावी, जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करुन गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एसटी वाहकावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.