भिमा गौतमी वस्तीगृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
मुलींनी गिरवले योगाचे धडे
नगर (प्रतिनिधी)- योग ही प्राचीन भारतीय परंपरेचे एका अमुल्य देणगी आहे. योगा शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी एक वरदान ठरत आहे. मानवी स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेला योग दीर्घायुषी व निरोगी बनवते, असे प्रतिपादन जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी केले.
युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, जय युवा अकॅडमी, प्रगती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भिमा गौतमी वस्तीगृहात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रगती फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी वाघ, डॉ. संतोष गिऱ्हे, जय युवचे ॲड. दिनेश शिंदे, माहेरच्या संचालिका रजनी ताठे, वस्तीगृह अधीक्षिका रजनी जाधव, प्रियंका सुत्रावे आदी उपस्थित होते.
अश्विनी वाघ यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आयुष्यासाठी दररोज सातत्याने योगा केला पाहिजे. सदृढ आरोग्य जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे योग असल्याचे त्यांनी सांगितले. तर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह योगाचे धडे देऊन त्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ. संतोष गिऱ्हे यांनी रसायनयुक्त, प्रदूषणमुक्त भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागते. तर दैनंदिन ताणतणावामुळे मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असून, दररोज योग, प्राणायाम व ध्यान केल्यास अनेक दुर्धर आजारांना दूर करुन मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबिरासाठी मेरा युवा भारताचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचे सूत्रसंचालन ॲड. दिनेश शिंदे यांनी केले. आभार रजनी ताठे यांनी मांनले.