जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात लावली झाडे
पर्यावरण संवर्धन हेच खरे राष्ट्रप्रेम -सुनील सकट
नगर (प्रतिनिधी)- भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माळी समाजाचे युवा नेते रोहित पठारे आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात अलका नेटके, मंगल शिंदे, स्वाती पानपाटील, मनीषा शिंदे, संगीता ठोकळ, प्रिया गायकवाड, येशुदास वाघमारे, राहुल डोळसे, किरण पारधे यांच्यासह पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करत राष्ट्रपती महोदयांच्या सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा आदर व्यक्त करण्यात आला. समाजात पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि हरित भारताच्या दिशेने योगदान देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू स्पष्ट करण्यात आला.
सुनील सकट म्हणाले की, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या स्त्री नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन हा वृक्षारोपण उपक्रम आयोजित केला आहे. पर्यावरणाची होणारी हानी थांबविणे ही काळाची गरज आहे. एक झाड लावणे म्हणजे एका पिढीसाठी छाया निर्माण करणे. पर्यावरण संवर्धन हेच आजचे खरे राष्ट्रसेवा आहे. यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकण्याचे त्यांनी सांगितले.
रोहित पठारे यांनी प्रत्येकाने समाजहितासाठी कार्य केले पाहिजे. राष्ट्रपती मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून महिला सक्षमीकरणाचा व झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.