जातीयवादी प्रवृत्तीतून ग्रामपंचायतच्या लिपिकाचे निलंबन केल्याचा आरोप
16 महिन्यांपासून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ; न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- नवनागापूर (ता. नगर) ग्रामपंचायतचे सरपंच यांनी तेथील कार्यरत लिपिक विश्वंभर भाकरे यांना जातीयवादी प्रवृत्तीतून पदाचा गैरफायदा घेत जातीय द्वेषापोटी कामावरुन काढून टाकल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. तात्काळ सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करुन भाकरे यांना पूर्ववत कामावर हजर करुन घेण्याच्या मागणीसाठी रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.
याप्रसंगी रिपाई महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, सारिका गांगुर्डे, स्वाती औताडे, सारिका साळवे, शितल नाटकर आदींसह भाकरे परिवारातील महिला सदस्या उपस्थित होत्या. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास 2 जुलै पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर पिडीत कुटुंबीयांसह उपोषण करण्याचा इशारा रिपाईच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
विश्वंभर भाकरे हे नवनागपूर ग्रामपंचायत या ठिकाणी लिपिक या पदावर कार्यरत आहेत. जातीय सूड भावनेने सरपंच यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सरपंच यांनी अनेकवेळा भाकरे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली त्यांचे निलंबन करण्यात आले, मात्र त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाही.
लिपिक पदावर ते एकटे नसून इतर व्यक्ती देखील कार्यरत आहेत. त्यांना कोणतीही विचारणा न करता एकट्याला जबाबदार धरुन याप्रकरणी बोलवून चौकशी न करता जातीयवादी प्रवृत्तीतून हुकूमशाही पद्धतीने सरपंच यांनी 2 जुलै 2024 रोजी कामावरून बेमुदत निलंबन केले. निलंबन करुन 16 महिने झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आहे. मागासवर्गीय असल्याने जातीय अत्याचाराला बळी पडल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जातीय अत्याचार करुन पदाचा गैरफायदा घेत कामावरुन बडतर्फ केल्याप्रकरणी नवनागापूर ग्रामपंचायतच्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा, भाकरे यांना पुन्हा नियमीत कामावर रुजू करुन घ्यावे व नियमित पगार मिळवून देण्याची मागणी रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.