पेन्शनर्सना नियमाप्रमाणे हक्क मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची -आनंद भंडारी
जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शनर्स अदालत पार पडली. भंडारी यांनी पेन्शनर्सना त्यांचे नियमाप्रमाणे हक्क मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे स्पष्ट करुन कोणतीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हा परिषद अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या अदालतसाठी शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, वित्तलेखा अधिकारी शैलेश मोरे, लेखा अधिकारी भालेराव, उपशिक्षणाधिकारी शिवगुंडे यांच्यासह नगर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि जिल्ह्यातील संघटनेचे पेन्शर्स सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, निधी वेळेवर येत असेल, तर पेन्शनर यांना 5 तारखेनंतर वेळेत पेन्शन दिलीच गेली पाहिजे. यासाठी वेगळे आदेश देण्याची गरज नाही. सेवा जेष्ठतेनुसार यादी तयार करुन प्राधान्य निश्चित करून पेन्शनर्सना लाभ देण्याचे त्यांनी सूचना केल्या.
जिल्हा परिषद अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने नव्याने हजर झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी व एक वर्ष वाढ मिळालेले शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या अदालतमध्ये निवड श्रेणी प्रस्ताव, सेवानिवृत्त व अंश राशीकरण, उपदान, गट विमा, संगणक कपाती इत्यादी संबंधित सेवानिवृत्तांनी प्रश्न मांडून त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी अहिल्यानगर पेन्शनर असोसिएशनचे दशरथ ठुबे, सरचिटणीस बन्सी उबाळे कार्याध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष विनायक कोल्हे, सुखदेव वांडेकर, ज्ञानदेव लंके, धोंडीबा गांगर्डे, सोमनाथ कळसकर, बापूसाहेब कर्पे, कारभारी शिकारे, भाऊसाहेब लावरे, ज्ञानदेव थोरात, रामचंद्र ठोंबरे, भाऊसाहेब गोरे, अविनाश गांगर्डे, प्रताप आंब्रे, बेबीताई तोडमल, शामला साठे, निनाबाई जोंधळे, गजानन ढवळे, मुरलीधर देशमुख आदींसह जिल्ह्यातील पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बन्सी उबाळे यांनी एकत्र आल्याशिवाय प्रश्न सुटणार नसल्याचे सांगून संघटनेच्या पाठपुराव्याने प्रश्न सुटत असल्याचे स्पष्ट केले. दशरथ ठुबे यांनी वेतन वाढच्या कापलेल्या रकमा देण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे. सेवा पुस्तकावरून निवड श्रेणीचे काम केले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले असून, उर्वरीत प्रश्न सोडविण्यास संघटनेचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यभान काळे, बबन कुलट, भीमसेन चत्तर, सुनील घोलप, तुकाराम ठाणगे, भाऊसाहेब काळे, निळकंठ बोर्डे यांनी परिश्रम घेतले.