जातीयवादी प्रवृत्तीतून सूड भावनेने निलंबन केल्याचा आरोप
16 महिन्यांपासून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ
नगर (प्रतिनिधी)- जातीयवादी प्रवृत्तीतून पदाचा गैरफायदा घेत कामावरुन बडतर्फ केल्याचा आरोप करुन नवनागापूर (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तक्रार विश्वंभर भाकरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामपंचायतमध्ये एकटा मागासवर्गीय लिपिक असल्याचे जातीय द्वेषापोटी कामावरुन काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विश्वंभर भाकरे हे नवनागपूर ग्रामपंचायत या ठिकाणी लिपिक या पदावर कार्यरत आहेत. लिपिक पदावर इतर लिपिक देखील कार्यरत असून, त्यांच्यात एकटा मागासवर्गीय असल्याने जातीय सूड भावनेने सरपंच यांनी निलंबन केले असल्याचे म्हंटले आहे.
दिलेल्या निवेदनात भाकरे यांनी म्हंटले आहे की, सरपंच यांनी अनेकवेळा जातीवाचक शिवीगाळ करुन कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. ते सहन केले, परंतु कालांतराने त्यांनी आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाखाली माझे निलंबन केले आहे. परंतु लिपिक पदावर एकटाच नसून इतर व्यक्ती देखील कार्यरत आहेत. त्यांना कोणतीही विचारणा न करता एकट्याला जबाबदार धरुन याप्रकरणी बोलवून चौकशी न करता व कोणतीही ठोस पुरावे नसताना फक्त जातीयवादी प्रवृत्तीतून हुकूमशाही पद्धतीने सरपंच यांनी 2 जुलै 2024 रोजी कामावरून बेमुदत निलंबन केले. संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून न्याय मागितला, मात्र अद्यापि न्याय मिळालेला नाही. निलंबन करुन 16 महिने झाले असून, कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आहे. मागासवर्गीय असल्याने जातीय अत्याचाराला बळी पडल्याचे नमुद केले आहे.
जातीय अत्याचार करुन पदाचा गैरफायदा घेत कामावरुन बडतर्फ केल्याप्रकरणी नवनागापूर ग्रामपंचायतच्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा, पुन्हा नियमीत कामावर रुजू करुन घ्यावे व नियमित पगार मिळवून देण्याची मागणी विश्वंभर भाकरे यांनी केली आहे.
