कापूरवाडी येथे कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची बैठक
संघटित महिलाच सामाजिक परिवर्तनाचा मूलाधार – संगीता घोडके
नगर (प्रतिनिधी)- कोरेगाव विजयस्तंभाच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या सामाजिक आणि न्यायालयीन लढ्यास बळकटी देण्यासाठी, कापूरवाडी येथे महिलांचे संघटन करण्याच्या उद्देशाने कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून महिलांमध्ये जागरूकता निर्माण करत त्यांच्या सहभागासाठी संघटनची हाक देण्यात आली.
या बैठकीचे आयोजन समितीच्या अहिल्यानगर महिला अध्यक्षा संगीता घोडके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन बैठकीची सुरुवात झाली. यावेळी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे प्रदेश संघटक व दक्षिण जिल्हा प्रभारी अध्यक्ष दीपक अमृत, कापूरवाडीच्या सरपंच जनाताई दुसुंगे, शाळा व्यवस्थापन समितीच्या जयश्री दुसुंगे, पंचायत समितीच्या सदस्या सुनिताताई भिंगारदिवे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
महिला अध्यक्षा संगीता घोडके यांनी आपल्या भाषणात, विजयस्तंभ म्हणजे स्वाभिमानाचे प्रतीक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दादाभाऊ अभंग या स्तंभाच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढा लढत आहेत. हा लढा सर्वांचा असून महिलांनी संघटित होऊन या संघर्षाला बळ देणे आवश्यक आहे. आपल्या एकतेतच शक्ती आहे, आणि महिलांच्या सक्रिय सहभागातूनच विजय निश्चित होईल, असे ठामपणे त्यांनी सांगितले.
दीपक अमृत यांनी जयस्तंभ रक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याचा आढावा घेत महिलांना शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीचा इतिहास सांगितला. त्यांनी असेही सांगितले की, हा विजयस्तंभ म्हणजे केवळ ऐतिहासिक स्मारक नाही, तर बहुजन समाजाच्या संघर्षाचे प्रतीक आहे. महिलांचा सहभाग या चळवळीत निर्णायक ठरेल.
सरपंच जनाताई दुसुंगे यांनी स्त्रिया जर एकवटल्या, तर कोणतीही चळवळ यशस्वी होऊ शकते. विजयस्तंभ रक्षणासाठी आपण सर्वांनी कटीबद्ध राहण्याचे त्यांनी आवाहन केले. जयश्री दुसुंगे यांनी महिला संघटन विषयी मार्गदर्शन केले.
या बैठकीला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यामध्ये वंदना कांबळे, रोहिणी कांबळे, ज्योती पाटोळे, मंगल भिंगारदिवे, सुप्रिया भिंगारदिवे, ऋतुजा भिंगारदिवे, जयश्री साळवे, सरुबाई शिंगारे, मीरा ठोंबे, पुष्पा भिंगारदिवे, प्रतिभा भिंगारदिवे, मनीषा जाधव, लंका पाडळे, रुक्सार शेख, सुनीताताई भिंगारदिवे, बेबीताई भिंगारदिवे, संगिता भिंगारदिवे, लंका भिंगारदिवे, वर्षा भिंगारदिवे, लहानुबाई अरुणे, सारिका भिंगारदिवे, लता भिंगारदिवे, रहीबाई साळवे, प्रीती भिंगारदिवे, कावेरी भिंगारदिवे, सुरेखा भिंगारदिवे, वैशाली भिंगारदिवे, शोभा भिंगारदिवे, कल्पना भिंगारदिवे, बबली भिंगारदिवे, कीर्ती उमाप, शिरीन सय्यद, भिमाबाई दुसंगे, रेणुका शिंदे, प्रियंका पाडळे, दिक्षा घोडके, जयश्री पाडळे, मनीषा पाडळे, राहुल अमृत आदींचा समावेश होता. गावातील महिलांनी एकजुटीने या बैठकीत सहभाग नोंदवून संघटनशक्तीचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता भिंगारदिवे यांनी केले. आभार रोहिणी कांबळे यांनी मानले.