ज्ञानसाधना गुरुकुलची वैष्णवी औशीकर 97% गुण मिळवून प्रथम
मुलांच्या बौध्दिक क्षमता ओळखा -विठ्ठल लांडगे
नगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल व लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. ज्ञानसाधना गुरुकुलमध्ये शिकत असलेली. कु. वैष्णवी औशीकर 97% गुण मिळवून प्रथम आली. रेवती साबळे 95% गुण मिळवून द्वितीय तर सिद्धनीता डंबाळे 93% गुण मिळवून तृतीय आली. तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे संगणक, सायकल व शैक्षणिक साहित्याचे बक्षिस देऊन इतर तब्ब्ल 50 हून अधिक विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पत्रकार विठ्ठल लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. लांडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे जिद्दीने अभ्यास केला, तर त्यांना यश नक्कीच मिळणार. फक्त चांगले टक्केवारी पडले म्हणजे विद्यार्थी यशस्वी झाला असे नाही. त्यांच्या मध्ये संस्कार असणे आवश्यक आहे. रोज सकाळी शाळेत जातांना आई-वडिलांच्या पाया पडूनच निघाले पाहिजे. तुमचे आई-वडील तुमचे दैवत आहेत. त्याच देवाकडे तुम्ही दुर्लक्ष करता, हे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळेतच संस्काराची रुजवण करणे काळाची गरज झाली आहे. मुलांचे पालक रिल्स बनवण्यात मग्न असतील तर हे पालकांचे अपयश म्हणावे लागेल. मुलांमधील गुण ओळखण्यासाठी त्यांच्याशी संवाद महत्त्वाचा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की, ज्ञानसाधना या छोट्याश्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून, या वटवृक्षाखाली अनेक गुणवंत विद्यार्थी घडत आहे. फक्त शिक्षण नव्हे, तर संस्कार देखील रुजवण्याचे कार्य ज्ञानसाधना परिवार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संभाजी पवार, जालिंदर कोतकर, छबुराव कोतकर, मुख्याध्यापक संदीप भोर, अजित कोतकर, नवनाथ कोतकर, गोरख कोतकर, विक्रम लोखंडे, ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रसाद जमदाडे, गिरीश पटवा, अनिकेत शियाळ, कुणाल चिपाडे, रवींद्र पंडित, अमित ढोरसकर, दत्तात्रय चेमटे, स्वप्नील परांडे, शाहरुख शेख, प्राचार्या रुचिता जमदाडे, शबाना शेख, प्रतीक्षा फुलारी, जोसना सातपुते, सुवर्णा दाणी, सुप्रिया मुळे, कल्याणी शिंदे, सपना साबळे, प्रतिभा साबळे, जयश्री साठे आदी शिक्षकांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अनुष्का राऊत यांनी केले. सूत्रसंचालन दिव्या रोकडे व श्रावणी कोळी यांनी केले. आभार आदिती कोठावळे हिने मानले.