हरित पंधरवड्यानिमित्त क्रांती ज्योती संस्था, संत सावता माळी परिषद व भाजप ओबीसी मोर्चाचा संयुक्त उपक्रम
झाडे केवळ निसर्गालाच नव्हे, तर मानवजातीच्या भविष्यासाठीही आवश्यक -गणेश बनकर
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील कामरगाव येथे शासनाच्या हरित पंधरवड्यानिमित्त एक पेड माँ के नाम! या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था, संत सावता माळी क्रांती परिषद व भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देत देशी झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, आवळा, जांभूळ, करंज व बाभळी यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या व पर्यावरण पूरक झाडांचा समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कामरगावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, माजी मुख्याध्यापक सुदाम ठोकळ, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कामरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक सुदाम ठोकळ, गोरख ठोकळ, माजी चेअरमन शिवाजी साठे, चंद्रकांत ठोकळ, शशिकांत ठोकळ, माजी सैनिक आबा ठोकळ, धनंजय बनकर, बबन ढमाले, एकनाथ थिटे, शेळके मामा आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश बनकर यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगताना नमूद केले की, वृक्ष लावणे नव्हे तर त्याचे संवर्धन ही खरी जबाबदारी आहे. झाडे केवळ निसर्गालाच नव्हे, तर मानवजातीच्या भविष्यासाठीही आवश्यक आहेत. आज आपण जो वृक्ष लावत आहोत, तो उद्याच्या पिढीसाठी छाया, अन्न, आणि प्राणवायू निर्माण करणार आहे. ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आपल्या मातृभूमीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे. एक पेड माँ के नाम म्हणजे आईच्या नावे फक्त एक झाड नाही, तर तिच्या मायेच्या आठवणींचा एक जीवंत साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक सुदाम ठोकळ यांनी वृक्षारोपण अभियान व संवर्धन चळवळीत शेतकरी वर्गाचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. शेताच्या बांधावर हिरवाई फुलविल्यास त्याचा फायदा पर्यावरणासाठी आणि फळांद्वारे आर्थिक हित देखील साधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सरपंच तुकाराम कातोरे यांनी उपक्रमाचे कौतुक करुन, या वृक्षारोपणामुळे गावाची हरित समृद्धी निश्चितच वाढेल. गावकऱ्यांनी सातत्याने अशा उपक्रमात भाग घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन डागवाले यांनी केले. आभार मेजर राजेंद्र शिंदे यांनी मानले.