महेश नागरी पतसंस्थेने भिंगारच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- महेश नागरी सहकारी पतसंस्था भिंगारच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. अनेक होतकरु युवक व गरजूंना कर्ज पुरवठा करुन त्यांना पायावर उभे करण्याचे काम केले. उद्योजक, व्यावसायिकांना भांडवल उभारणीत आधार दिला. पतसंस्थेची विकासात्मक वाटचाल सुरु असून, पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेले डॉ. श्रीकांत गांधी आणि रतिलाल गुगळे यांचा अनुभव संस्थेला अधिक व्यावसायिक आणि धोरणात्मक दृष्टिकोन देईल, तसेच आनखी विकासात्मक दिशेने घेवून जाणारा ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी संस्थेचे जेष्ठ संचालक डॉ. श्रीकांत गांधी आणि संस्थापक संचालक रतिलाल गुगळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आमदार जगताप यांनी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर (मन्नूशेठ), संचालक मारुती पवार, राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक संजय चोपडा, राजेंद्र गांधी आदी उपस्थित होते.
संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर यांनी संस्थेच्या तीन दशकामधील वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले, महेश नागरी पतसंस्था ही आज जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखली जाते, ते यामागे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, संचालकांची आणि कर्मचाऱ्यांची कठोर मेहनत आहे. पतसंस्थेने सर्वांचा विश्वास मिळवला असून, शहरातील मोठी पंतसंस्था म्हणून याकडे पाहिले जाते, असे त्यांनी सांगितले.
मारुती पवार म्हणाले की, डॉ. श्रीकांत गांधी व रतिलाल गुगळे यांचा सहकार क्षेत्रातील सखोल अभ्यास, संस्थेच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दोन्ही अभ्यासू व्यक्तीमत्व असून, संस्थेसाठी त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन दीपस्तंभाप्रमाणे राहणार आहे. सहकार क्षेत्रातही आमदार जगताप यांचे पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.