• Sat. Sep 20th, 2025

मागासवर्गीय कुटुंबीयांच्या शेत जमीनीकडे जाणारा शेत पाणंद रस्ता खुला करा

ByMirror

Jun 10, 2025

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

शेत जमीन बळजबरीने विकत घेण्याच्या उद्देशाने त्रास दिला जात असल्याचा आरोप; रस्ता खुला न झाल्यास 19 जून रोजी उपोषणाचा इशारा


नगर (प्रतिनिधी)- भाळवणी ते ढवळपुरी रस्त्यालगत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबीयांची शेत जमीनीकडे जाणारा शेत पाणंद रस्ता खुला करुन देण्याची मागणी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन प्रभारी निवासी जिल्हाधिकारी अरुण उंडे यांना देण्यात आले. तर सदरील शेत जमीन बळजबरीने विकत घेण्याच्या उद्देशाने मागासवर्गीय कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेवराव चांदणे, रामदास साळवे, संतोष शेलार, राजेंद्र आल्हाट, नामदेवराव चांदणे, पी.बी. पाथरे, पांडुरंग घोरपडे, सूर्यभान वैराळ, बापू साळवे, संपत गायकवाड, अजित चौधरी, रमेश वैराळ, आकाश वैराळ, चंदा साळवे, किशोर भालेराव, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.


भाळवणी येथे मागासवर्गीय वैराळ कुटुंबीय शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करत आहे. मात्र ढवळपूरी येथील काही धनदांडगे व्यक्ती त्यांना शेतजमीन विकत देत नसल्याने वैराळ यांना विविध कारणांनी त्रास देत आहे. कोणत्याही कारणाने भांडण करणे, जीवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार करत आहे. नुकतेच वैराळ यांच्या शेतीचा रस्ता त्यांनी दगड व काटे टाकून अडविला आहे. भाळवणी ते ढवळपुरी जाणारा रस्ता वैराळ वस्ती जवळ बंद करण्यात आला असून, वैराळ कुटुंबीयांच्या वस्तीवर कोणतेही वाहन येऊ शकत नाही. भाळवणी ग्रामपंचायतीने दलित विकास निधीतून वैराळ वस्तीसाठी 5 लाख रुपये मंजूर करून रस्त्याचे काम सुरू केले आहे. परंतु सदरील धनदांडग्या कुटुंबीयांनी रस्त्याचे काम बंद पाडून रस्ता अडविला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


यासंदर्भात पारनेर तहसीलदार यांच्याकडे दाद मागून देखील त्याला कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. सदरचा रस्ता अडविणाऱ्यांवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, तात्काळ अडविलेला रस्ता खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा वैराळ कुटुंबीय सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान, अखिल मातंग समाज चळवळ, मानवीत लोकशाही पक्ष, लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने 19 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *