कोल्हारमध्ये वडाच्या रोपांची लागवड; जय हिंद फाउंडेशनचा पुढाकार
आईच्या आठवणींचे सानिध्य झाडांच्या रुपात लाभणार -शिवाजी पालवे
नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाउंडेशनच्या वतीने कोल्हार गावात एक झाड आईच्या नावाने या प्रेरणादायी उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत वडाच्या रोपांची लागवड करून मातृप्रेमाला वृक्षारोपणाच्या माध्यमातून अभिव्यक्त करण्याचा स्तुत्य प्रयत्न हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाची सुरुवात कोल्हार गावच्या दिवंगत सरपंच स्वर्गीय कौसाबाई पालवे यांच्या स्मरणार्थ करण्यात आली. त्यांच्या नावाने वडाचे झाड लावून या अभियानाचा प्रारंभ झाला. कार्यक्रमात गावचे उपसरपंच गोरक्षनाथ पालवे, रमेश पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, राजेंद्र पालवे, मदन पालवे, किरण पालवे, कृष्णा बाळासाहेब पालवे, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, बाबाजी नाथा पालवे, मुख्याध्यापक देविदास गीते, दिनकर पालवे, रोहीदास पालवे, सन्नी गर्जे, अमोल पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय कौसाबाई पालवे यांनी सरपंच पदाची जबाबदारी निभावताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लागली आणि गावाला आदर्श गाव बनवण्याचा मार्ग त्यांनी तयार केला. त्यांच्या पश्चात सहा मुले, एक मुलगी व 21 नातवंडांचा मोठा परिवार असून आज संपूर्ण पालवे कुटुंबाला त्यांच्या आठवणींचे सानिध्य झाडांच्या रुपात लाभणार आहे, असे शिवाजी पालवे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.
कार्यक्रमात स्व. कौसाबाई पालवे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या उपक्रमात रमेश पालवे यांनी सांगितले की, आपल्या आईच्या स्मरणार्थ लावलेली झाड मोठे होईपर्यंत त्यांचे जतन व संवर्धन केले जाणार आहे. मुख्याध्यापक देविदास गीते यांनी जय हिंद फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करुन, ही चळवळ संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण व संवर्धनासाठी एक आदर्श ठरणार असल्याचे स्पष्ट केले.
एक झाड आईच्या नावानेफ ही संकल्पना केवळ वृक्षारोपणापुरती मर्यादित नसून, ती आपल्या जीवनात आईच्या स्थानाची आठवण करून देणारी जिवंत प्रतीक ठरणार आहे. या अभियानात सहभागी होवून आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.