• Tue. Jul 22nd, 2025

शिक्षक परिषदेचे शिक्षणमंत्र्यांसह शिक्षण विभागाला निवेदन; पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

ByMirror

Jun 10, 2025

राज्यात वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणापासून सुमारे दहा हजार शिक्षक वंचित -बाबासाहेब बोडखे

प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मिळणारी अपमानास्पद वागणुक व गैरसोयीबद्दल वेधले लक्ष

नगर (प्रतिनिधी)- राज्यात वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणापासून सुमारे दहा हजार शिक्षक वंचित राहिले असताना त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. तर प्रशिक्षणात शिक्षकांना मिळणारी अपमानास्पद वागणुक व गैरसोयीबद्दल लक्ष शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे. यासंदर्भात शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार तथा राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना निवेदन दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


राज्यातील तालुका सर्व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा 2 जून पासून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत 12 जून पर्यंत होणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी 2 जून रोजी सकाळी प्रशिक्षणातील शिक्षक प्रशिक्षण केंद्रावर उपस्थित झाले, परंतु त्यांची नियोजित कार्यपद्धतीनुसार उपस्थिती नोंदविण्यात न आल्यामुळे त्यांना प्रशिक्षणात अनुपस्थिती दाखवण्यात आली. दुसऱ्या दिवशी 3 जूनला त्यांना परत पाठवण्यात आले. काही केंद्रावर प्रशिक्षणार्थी शिक्षकांना 3 व 4 जूनला प्रशिक्षणातून परत पाठवण्यात आले. प्राप्त माहितीनुसार राज्यातील प्रशिक्षण केंद्रावरून सुमारे दहा हजार प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रशिक्षणापासून वंचित करून परत पाठवण्यात आले असल्याची आरोप शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.


ही अत्यंत खेदजनक बाब आहे. प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रत्येक तासिके नंतर मूल्यमापन करिता प्रश्‍नपत्रिका सोडवून उत्तर पत्रिका दहा मिनिट कालावधीत लिंक अपलोड करावी लागते. त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. लिंक ओपन न होणे, प्रशिक्षणार्थीचा मोबाईल नंबर चुकीचा दाखवणे, सर्व्हर डाऊन असणे याबाबतच्या समस्यांचा सामना प्रशिक्षणार्थींना करावा लागत आहे. प्रशिक्षण केंद्रावर चहा, नाश्‍ता, जेवण, पिण्याचे शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही. प्रशिक्षणार्थ्याकडून नोंदणी शुल्क 2 हजार रुपये घेण्यात आलेले असताना त्यांची गैरसोय होत आहे. शिक्षकांना प्रशिक्षणाच्या नावाखाली वेठीस धरणे, त्यांना अपमानित करणे, नोकरासारखी वागणूक देणे वेदनादायक आहे. प्रशिक्षणाच्या नावाखाली शिक्षकांच्या मानभंग करणाऱ्या प्रवृत्तीचा शिक्षक परिषदेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.


एकूण शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण प्राप्त होऊ नये आणि ते वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीपासून वंचित रहावे, या दृष्ट हेतूने नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण केंद्रावर शिक्षकांना मिळालेल्या वागणुकीबाबत चौकशी करावी, संबंधितांना योग्य ती ताकीद द्यावी, वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी शिक्षकावर होत असलेल्या अन्याय बाबत व गैरसोयीबाबत तात्काळ दखल घेऊन प्रशिक्षणापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.



वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणापासून प्रशिक्षणार्थी शिक्षकांची अवहेलना करण्यात आली आहे. प्रशिक्षणातून त्यांना परत पाठविण्यात आले, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नोंदणी शुल्क भरलेले असताना देखील प्रशिक्षणार्थी शिक्षकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशिक्षण केंद्रावर कोणतीही सोय नसल्याने शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. -बाबासाहेब बोडखे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *