कामगारांच्या हक्कासाठी एकवटले लाल बावटाधारी!
मेहेर बाबा कामगार युनियनमध्ये कार्यकारिणी सदस्यांची व भाकपच्या त्रैवार्षिक पक्ष अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची निवड
केंद्र व राज्य सरकारचे धोरण भांडवलदाराच्या इशाऱ्यावर -कॉ. ॲड. सुभाष लांडे
नगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या भाकप कामगार आघाडीच्या त्रैवार्षिक पक्ष परिषदेत नवीन कामगार कायद्यांना विरोध दर्शविण्यात आला. लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियन, अरणगाव यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रैवार्षिक पक्ष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यामध्ये कामगारांच्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करुन, केंद्र सरकारने भांडवलदारांच्या हितासाठी नव्याने आणलेल्या नवीन कामगार संहिता कायद्याला विरोध दर्शविण्यात आला. या बैठकीत युनियनमध्ये नवीन कार्यकारिणी सदस्यांची व त्रैवार्षिक पक्ष अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
बुरुडगाव रोड येथील भाकच्या पक्ष कार्यालयात कामगारांची बैठक भाकपचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी लाल बावटाचे जिल्हा सचिव कॉ.ॲड. सुधीर टोकेकर, कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, सुभाष शिंदे, प्रविण (बबन) भिंगारदिवे, सुनिता जावळे, विजय भोसले, संजय कांबळे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे आदींसह कामगार उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मेहेर बाबा कामगार युनियनची 31 मार्च 2026 रोजी कराराची मुदत संपत असून, नवीन कराराच्या पार्श्वभूमीवर कामगारांना वाढीव पगारवाढ संदर्भात आणि कामगारांना अपेक्षित असलेल्या विविध लाभ संदर्भात चर्चा करण्यात आली.
कॉ. ॲड. सुभाष लांडे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारचे धोरण भांडवलदाराच्या इशाऱ्यावर चालत असून, सर्वसामान्य कामगारांना त्यांच्या दावणीला बांधण्यात आले आहे. भांडवलदारांचे हित पाहून निर्णय घेतले जात असून, कामगार, कष्टकरी वर्ग देशोधडीस लागला आहे. पक्षाने नेहमीच श्रमिक, कष्टकरी कामगारांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या न्याय, हक्कासाठी पक्ष संघर्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, देशांमध्ये कामगारांच्या विरोधात कायदे तयार होत आहे. मोठ्या संघर्षाने तयार केलेले 44 कायदे बंद करून, चार नवीन कायदे तयार करण्यात आले. या कायद्यामुळे कामगारांना मिळालेला कवच काढून घेण्यात आला आहे. या नवीन कायद्याने कर्मचारी यांना कायम होणे अवघड होणार आहे. पाच वर्षे त्याला कंत्राटीमध्ये घेतलं, तर पाच वर्षाच्या आत किंवा नंतरही त्याला कधीही काढू शकतात आणि त्याला कायम दर्जा मिळू शकत नाही. संप करण्यावर सुद्धा मोठे बंधन कायद्याने घातले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉ. सतीश पवार यांनी युनियनच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करुन, युनियनची एकजूट तोडण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. या दबाव तंत्राला न जुमानता सर्व एकजुटीने कामगारांच्या न्याय, हक्कासाठी लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत नवीन कामगार कायदे रद्द होण्यासाठी 7 जुलै रोजी होणाऱ्या देशव्यापी जेल भरो आंदोलनात मोठ्या संख्येने कामगारांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कामगारांना किमान वेतन 26 ते 30 हजार देण्यात यावे, त्याचप्रमाणे कामगारांना किमान पाच हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, कामगारांना घरकुल देण्यात यावे, वाढती महागाई कमी व्हावी या मागणीसाठी आयटक व भाकप संयुक्तपणे लढा करणार असल्याचा ठराव घेण्यात आला. शहरात 14 जून रोजी होणाऱ्या भाकपच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सर्व कामगारांच्या वतीने सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळाची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये जिल्हा सेक्रेटरी ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, सहसेक्रेटरी कॉ. सतीश पवार, कार्यकारणी सदस्य कन्हैया बुंदेले, सुभाष शिंदे, मारुती सावंत, राजेंद्र पळसकर, देविदास साळवे, मारुती दहिफळे, वसंत दहिफळे, रामभाऊ कल्हापूरे, राजेंद्र मोरे, दिगंबर माने यांचा समावेश आहे.
तसेच यावेळी अवतार मेहेर बाबा कामगार युनियनच्या कार्यकारिणीत चंद्रकला देशमुख, रामभाऊ कल्हापूरे, श्रीनाथ पाटोळे, गणेश गहिले, राजेंद्र मोरे, दिगंबर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसाठी सूचक प्रवीण भिंगारदिवे व अनुमोदक देविदास ससाने हे होते. सर्वांच्या सहमतीने ही नियुक्ती करण्यात आली.