पर्यावरण दिनाचा उपक्रम; नवीन पिढीत पर्यावरणाबद्दलची जागृती निर्माण करण्याचा उपक्रम
झाडे लावणे, ती जपणे पुढील पिढीच्या भवितव्यासाठी -विजय भालसिंग
नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वाळकी (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी आपल्या नातीच्या हस्ते शेताच्या बांधावर वृक्षारोपण करत पर्यावरण संरक्षणाचा सकारात्मक संदेश दिला. निसर्ग संवर्धनासाठी केवळ वृक्षारोपण पुरेसे नाही, तर झाडांचे संगोपनही तितकेच महत्त्वाचे आहे, हे या उपक्रमातून नवीन पिढीला आवाहन करण्यात आले.
वृक्षारोपणासाठी भालसिंग यांनी नात आर्या बेरड व शिवश्री जगताप यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा या चिमुकल्यांनी संकल्प केला. लहान वयातच पर्यावरणाबद्दलची जबाबदारी शिकवण्याचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विजय भालसिंग गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणातून योगदान देत आहेत. त्यांनी वृक्षारोपण हे केवळ एक औपचारिक कार्यक्रम न मानता, त्याला समाज प्रबोधनाचे व्रत मानले असून, नवीन पिढीमध्ये निसर्गप्रेम रुजावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पर्यावरण रक्षणाची साखळी घरापासूनच सुरू करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला.
भालसिंग म्हणाले, प्राचीन काळापासून माणसाच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर झाडांनी साथ दिली आहे. लहानपणीच्या पांगुळगाड्यांपासून ते म्हातारपणातील आधार असणाऱ्या काठीपर्यंत झाडे मानवाच्या जीवनाशी घट्ट जोडलेली आहेत. मात्र अलीकडील काळात विकासाच्या नावाखाली निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे, त्यामुळे आज पर्यावरण संकट बिकट बनले आहे.
झाडे ही निसर्गाने मानवाला दिलेली अमृतासारखी वरदान आहे. झाडांच्या रुपाने आपणास छाया, अन्न, प्राणवायू, औषधे आणि हवामानाचा समतोल मिळतो. त्यामुळे झाडे लावणे, ती जपणे आणि पुढील पिढीला त्याचे महत्त्व पटवून देणे हे आपले कर्तव्य आहे, असेही भालसिंग यांनी नमूद केले.