भन्ते विनयाचार्य यांना झालेली अटक व बिहारचे राज्यपालांनी धार्मिक भावना दुखावल्याचा निषेध
महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- बिहार मधील बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. तसेच महाबौध्दि बुद्धविहारच्या मुक्तीसाठी सुरु असलेले आंदोलन दडपण्यासाठी सुरु असलेले कटकारस्थान, भन्ते विनयाचार्य यांना झालेली अटक व बिहारचे राज्यपाल यांच्या माध्यमातून बौध्द समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा निषेध करण्यात आला.
टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मधील भगवान गौतम बुद्ध व माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जावून जोरदार निदर्शने करण्यात आली. बोधगया महाविहार कायदा 1949 चा अन्यायकारक कायदा रद्द करण्यासाठी समाजबांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सदर मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले.
संपूर्ण देशभरात 12 फेब्रुवारी पासून महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. बिहार सरकार व केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. जाणीवपूर्वक आरएसएस व भाजपने बिहार येथील राज्यपाल यांना महाबौध्दि बुद्धविहारात पाठवून शिवलिंगची पूजा करवून घेतली. यापूर्वी देखील त्यांनी महाबोधी महाविहारला शिवालय संबोधित करून देशातील बौध्द समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान मुस्लिम असून वैदिक मंत्र उच्चारात त्यांच्याकडून पूजा करविण्यात आली आहे. राज्यपालांनी आंतरराष्ट्रीय धरोवर असलेल्या महाबोधी महाविहारचा अपमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बीटीएमसी बौद्ध धरोवर नष्ट करण्यासाठी बनवण्यात आले आहे. बीटी ॲक्ट रद्द करण्याची मागणी यावेळी समाजबांधवांनी केली.बिहार तथा केंद्र सरकार भारतातील बौद्ध समाजाला उकसवण्याचे काम करत आहे. 13 मे रोजी बिहार येथे महाबौध्दि बुद्धविहारच्या मुक्तीसाठी शांततेने सुरु असलेल्या आंदोलनात काही जातीयवादी गुंडांनी धुडगुस घातला. बिहार पोलिसांनी ही परिस्थिती आटोक्यात आणण्याऐवजी भन्ते विनयाचार्य यांच्यासह त्यांच्या साथीदारांना अटक केली. यामुळे सर्व समाज बांधवांच्या भावना तीव्र असून, तात्काळ बीटी ॲक्ट रद्द करुन बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
15 जूनला शहरात रॅलीचे आयोजन व 2 ऑक्टोबरला नागपूर येथील आरएसएस कार्यालयावर घेराव आंदोलन
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने अहिल्यानगर शहरात 15 जून रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर 2 ऑक्टोबरला नागपूर येथील आरएसएस कार्यालयावर मोर्चाने जावून घेराव आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये सर्व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.