वैद्यकीय महाविद्यालय इतर ठिकाणी घेऊन जाण्यास विरोध; जिल्हाधिकारी यांना निवेदन
जिल्ह्याच्या आरोग्यासाठी आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून वैद्यकीय महाविद्यालय शहरालगत व्हावे -भरत खाकाळ
नगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या लगत करण्याची मागणी करुन शहराबाहेर वैद्यकीय महाविद्यालय करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे.
सदर मागणीसाठी आपचे शहराध्यक्ष भरत खाकाळ यांच्या नेतृत्वाखाली आपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्ष ॲड. विद्याताई शिंदे, महासचिव दिलीप घुले, कला-सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, संघटक रवी सातपुते, सहसंघटक विक्रम क्षीरसागर, सचिव सचिन ऐकाडे, पर्यावरण आघाडी अध्यक्ष अजित कटारिया, उपाध्यक्ष अंबादास जाधव, युवा आघाडी अध्यक्ष विजय लोंढे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीन विकासासाठी नगर शहरालगत सुरू झाले पाहिजे. शिर्डी येथे सदर महाविद्यालय स्थलांतर करण्याचे षडयंत्र सुरू असून, जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणून अहिल्यानगर शहर परिसरात हे महाविद्यालय उपयुक्त ठरणार आहे. यासाठी शहरालगत 25 ते 30 एकर जागाही उपलब्ध आहे. मुख्यमंत्री व संबंधित समितीला आपच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आलेला असून, जनतेच्या सोयीचा व हिताचा विचार करून भूमिका घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिर्डीला आधीच एक मोठे हॉस्पिटल असून, हे महाविद्यालय तिकडे नेल्यास संपूर्ण जिल्ह्याचा लाभ मर्यादित राहील. नगर शहरालगत हे महाविद्यालय झाल्यास जिल्हा रुग्णालयाचा उपयोग होईल आणि शहराच्या विकासालाही हातभार लागणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प इतर ठिकाणी पळवून नेण्याचा सपाटा राजकीय पुढाऱ्यांनी लावला आहे. यामुळे शहरालगत आजही विमानतळ होवू शकले नाही. मोठे राजकीय नेते शहराला डावलून आपल्या मतदार संघात प्रकल्प घेवून जात आहे. यामुळे शहराचा विकास खुटला जात आहे. शहरासह जिल्ह्याच्या आरोग्यासाठी आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरालगत होण्याची आपची भूमिका आहे. वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याची देखील तयारी आहे. -भरत खाकाळ (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी)