ड्रेनेजलाईन फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
नगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड येथील रस्त्याचे काम सप्तपदी मंगल कार्यालय येथे मागील तीन महिन्यांपासून थांबले आहे. तीन महिन्यांपासून रस्ता खणून ठेवल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर जेसीबीने रस्ता खोदताना ड्रेनेजलाईन फुटल्याने सर्व घाण पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरुन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून, लवकरच शाळा व पावसाळा देखील सुरु होत आहे. ठप्प झालेले काम तात्काळ सुरु करण्यासाठी नागरिकांमधून मागणी होत आहे. पावसाळा सुरु झाल्यास नागरिकांना पलीकडील भागात जाण्यास रस्ता असून देखील तो रहदारीसाठी बंद होणार आहे. तसेच शालेय विद्यार्थी व महिला वर्गाला देखील या रस्त्यावरुन वाट काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे राहिलेले शेवटच्या टप्प्यातील काम पूर्ण करण्याची नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.