• Fri. Sep 19th, 2025

शीख समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी

ByMirror

May 31, 2025

जिल्ह्यातील शीख समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन


राज्यातील शीख समाजाचे अनेक घटक आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले असल्याचा दावा

नगर (प्रतिनिधी)- शीख समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी जिल्ह्यातील शीख समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील शीख समाजाचे अनेक घटक अजूनही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत. या समाजातील नागरिकांच्या सर्वांगीन विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती झाल्यास अल्पसंख्याकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना शीख समाजालाही न्याय देतील. अलीकडेच जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला, त्याचे शीख समाज स्वागत करत आहे. त्याच धर्तीवर शीख समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे.
पूर्वी अल्पसंख्याक आर्थिक महामंडळात या समाजांचा समावेश होता, परंतु बहुतेक अल्पसंख्याक योजना फक्त एका विशिष्ट समुदायास अधिक लाभदायक ठरत आहेत. परिणामी शीख समाज दुर्लक्षित राहत आहे. म्हणून, या समाजाला उद्दिष्ट ठेऊन स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे ही काळाची गरज बनली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


सिंधी आणि पंजाबी समाज हिंदू समुदायाचा भाग असला तरी त्यांचा समावेश अल्पसंख्याक महामंडळात झालेला नाही. मात्र, हे दोन्ही समाज श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांच्यावर श्रद्धा ठेवतात आणि शीख समाजासोबत समान सांस्कृतिक परंपरा पाळतात. त्यामुळे या दोन्ही समाजांचा समावेश प्रस्तावित महामंडळात करण्यात यावा.


शीख समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन त्याच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्ज सुविधा मिळावी, व्यवसाय व रोजगार प्रशिक्षण योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज, महिलांसाठी विशेष आर्थिक योजना, कृषी क्षेत्रात कार्यरत नागरिकांसाठी मदतीच्या योजना, विद्यमान अल्पसंख्याक आयोगाच्या निधीपैकी एक भाग यामध्ये वापरला जावा, याचा प्रारंभ महाराष्ट्रापासून व्हावा, या महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असावे व प्रत्येक जिल्ह्यात शाखा सुरू करून लाभप्राप्ती सुनिश्‍चित करावी, महाराष्ट्रात स्वतंत्र शीख कल्याण आयोगाची तातडीने स्थापना करावी, जेणेकरून शीख समाजाला सरकारी योजनांचा समतोल लाभ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.


या मागणीसाठी हरजीतसिंग वधवा, जनक आहुजा, लकी सेठी, प्रितपालसिंग धुप्पड, गुरबच्चनसिंग चुग, राजेंद्र कंत्रोड, सरबजितसिंघ सेठी, गुलशन कंत्रोड, मुन्ना जग्गी, राजू जग्गी, सनी वधवा, सीमरजितसिंग वधवा, करणसिंग धुप्पड, हरदीपसिंग कथुरिया, सनमितसिंघ चुग, रणजीतसिंग ठकराल, राजा नारंग, मनोज मदान, किशोर रंगलानी, मंजितसिंघ चुग, कन्हैया कुकरेजा, राहुल बजाज, राजकुमार बत्रा, मन्नू कुकरेजा आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *