सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नगर चॅप्टरचा उपक्रम
यशस्वी विद्यार्थ्यांच्या वाटचालीस बळ देणारा उद्योजकांचा प्रेरणादायी सोहळा
नगर (प्रतिनिधी)- सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, नगर चॅप्टरच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या पंधरवडामीटिंगमध्ये इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उद्योजकांच्या विकासासाठी आणि नव्या पिढीला दिशा देण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या या ट्रस्टच्या वतीने गुणवंतांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन अजित पवार, सेक्रेटरी नंदेश शिंदे, खजिनदार सचिन शिरसाठ, नगर चॅप्टरचे सर्व सदस्य, क्रॉस चॅप्टरचचे सदस्य, शहरातील उद्योजक व पुणे येथील व्यावसायिक प्रशिक्षक उपस्थित होते.
चेअरमन अजित पवार म्हणाले की, दहावी व बारावी ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी असून, त्यात मिळवलेले यश म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मजबूत पाया आहे. या यशातून विद्यार्थ्यांनी अधिक प्रेरणा घेत सातत्याने पुढे वाटचाल करावी. त्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीचे महत्त्व स्पष्ट करुन विद्यार्थ्यांना भविष्यात योग्य दिशा निवडण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात उद्योजकांच्या पाल्य असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार पालकांसह करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये पायल धनंजय पवार, अंजली राठोड, पीयुष गुंडू, सर्वेश तवले, ऐश्वर्या ठाणगे, दिव्या राणे, आणि आर्चित कदम यांचा समावेश होता. त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पालकांच्या वतीने ॲड. तवले यांनी ट्रस्टच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत आभार मानले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे असे उपक्रम समाजाला दिशा देतात, असे ते म्हणाले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उद्योजक सचिन राणे, हॉटेल सुवर्णम प्राईडचे महेश धुमाळ आणि तोडमल क्लासेसचे अक्षय तोडमल यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदेश शिंदे यांनी केले, तर आभार ट्रस्टचे खजिनदार सचिन शिरसाठ यांनी मानले. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट द्वारे उद्योजकांच्या उन्नतीसाठी चालविलेल्या चळवळीमध्ये मध्ये सहभागी होण्यासाठी या 9271710892 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.