दोन दशकापासून आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी ठरतोय आरोग्यदूत -डॉ. प्रवीण मुनोत
80 रुग्णांची मोफत तपासणी; अल्पदरात केल्या जाणार विविध शस्त्रक्रिया
नगर (प्रतिनिधी)- मागील दोन दशकापासून आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्यदूत ठरला आहे. खर्चिक व अद्यावत सर्व आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. 100 बेड पासून दुमजली इमारतीपासून सुरू झालेला हा प्रवास बहुमजली इमारतीसह दुपटीने बेडची संख्या आणि अद्यावत ऑपरेशन थिएटरद्वारे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा दिली जात असल्याचे प्रतिपादन जनरल सर्जन डॉ. प्रवीण मुनोत यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित जनरल शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून सेवा देणारे डॉ. मुनोत बोलत होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, अभय गुगळे, मानकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, डॉ. विवेक भापकर आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. मुनोत म्हणाले की, आनंदऋषीजीचे ऑपरेशन थिएटर प्रशस्त, सुसज्ज व अद्यावत असून, एकाच वेळी 5 ऑपरेशन होऊ शकतात. यामध्ये हृदयरोग वेगळे असून, एन्जोप्लास्टीसाठी वेगळी कॅथलॅब उपलब्ध करण्यात आलेली आहे. दर महिन्याला मोठ्या प्रमाणात यशस्वी शस्त्रक्रिया होत असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी हॉस्पिटल स्थापनेपासूनचा सुसज्ज हॉस्पिटल पर्यंतचा अनुभव विशद केला.
प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी दर महिन्याला दोन शिबिर घेण्यात येत आहे. स्थापनेपासून काही तज्ञ डॉक्टर या रुग्णसेवेशी जोडले गेले असून, त्यांचा प्रदीर्घ अनुभव रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. अद्यावत आरोग्य सुविधा, कमी खर्चात शस्त्रक्रिया व तज्ञ डॉक्टर रुग्णांना नवजीवन देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
जनरल शस्त्रक्रिया शिबिरात डॉ. प्रवीण मुनोत व डॉ. विवेक भापकर यांनी 80 रुग्णांची तपासणी केली. गरजेनूसार रुग्णांवर अपेंडिक्स, इगवायनल हर्निया, हायड्रोसिल आदी जनरल शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.