सीमेवरच्या जवानांसाठी कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांसाठी मोफत वैद्यकीय सेवा
सैनिकाच्या मुलीला वाचवले मृत्यूच्या दाढेतून; बिकट परिस्थितीत दिले मोफत उपचार
नगर (प्रतिनिधी)- देशाच्या सीमांवर सज्ज असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आता आरोग्यविषयक चिंता करावी लागणार नाही. नगरमधील चाईल्ड केअर हॉस्पिटलने लष्करातील जवानांच्या मुला-मुलींना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या सेवेमुळे अनेक सैनिक कुटुंबियांना दिलासा मिळाला असून, सैनिक कुटुंबीयांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीरामपूर येथील एका जवानाच्या एकुलत्या एक मुलीला, तेजस्विनीला, खोकला आणि दम लागण्याची तक्रार निर्माण झाला. तिला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सांगितले की तिच्या ऑक्सिजनचे प्रमाण खूपच घटले असून (86%), तिला तात्काळ कृत्रिम श्वासोच्छ्वासाची आवश्यकता आहे. मात्र, खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार करणे त्यांच्या कुटुंबाला शक्य नव्हते. यावेळी डॉ. बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली तिला नगरमधील चाईल्ड केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथील डॉ. उज्ज्वला शिरसाठ यांनी तत्काळ तिच्यावर उपचार सुरू केले. तीन दिवस ऑक्सिजनच्या साहाय्याने जीवनासाठी लढा देत तेजस्विनीने शेवटी उपचारांना प्रतिसाद दिला. तिचे वडील सीमेवर कर्तव्य बजावत असतानाच, तेजस्विनीनेही मृत्यूशी यशस्वी झुंज दिली आणि यातून ती ठणठणीत बरी झाली.
तेजस्विनीच्या उपचारात डॉ. गणेश मिसाळ, डॉ. वर्षा, मच्छिंद्र नवगिरे, विद्या सिस्टर यांचे मोलाचे योगदान होते. अवघ्या आठ दिवसांत बरे झाल्यावर तेजस्विनीला डिस्चार्ज देण्यात आला. तिच्या आईचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबलेले होते. शब्द अपुरे पडले पण त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता.
चाईल्ड केअर हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, लष्करातील जवानांच्या मुलांसाठी कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेचा संपूर्ण खर्च हॉस्पिटल स्वतः उचलत आहे. सीमेवर सज्ज असलेल्या जवानांना त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी करता यावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. डॉ. उज्ज्वला शिरसाठ यांनी सर्व लष्करी कुटुंबीयांना आवाहन केले आहे की, त्यांनी या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही संकटात चाईल्ड केअर हॉस्पिटल त्यांच्या पाठीशी उभे राहील याची खात्री दिली.