डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा केला जागर
लंडनमधील ऐतिहासिक ग्रेज इन येथे भारताचे केले प्रतिनिधित्व
नगर (प्रतिनिधी)- लंडन येथील ऐतिहासिक ग्रेज इन येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वप्नील खामकर यांनी आपला संशोधन प्रबंध सादर करत भारताचे, विशेषतः महाराष्ट्राचे प्रभावी प्रतिनिधित्व केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक दृष्टी: न्याय, समता आणि लोकशाही यांचे पुनर्विचार या विषयावर आधारित या परिषदेत त्यांनी आंबेडकर विचारधारेचा जागतिक परिषदेत अभ्यासपूर्वक मागोवा घेतला.
या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, मुंबई विद्यापीठ आणि ग्रेज इन, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. डॉ. आंबेडकर यांच्या लंडनमधील शिक्षण प्रवासाचे स्मरण करत, त्यांच्या विचारांचा जागतिक प्रभाव अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून ही परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय राज्य मंत्री, माहिती आणि प्रसारण व संसदीय कार्य मंत्रालयाचे डॉ.एल. मुरुगन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागचे (महाराष्ट्र शासन) संजय शिरसाट, मुख्य सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागचे हर्षदीप कांबळे (आयएस), माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, अण्णा भाऊ साठे अभ्यास केंद्र, मुंबई विद्यापीठचे संचालक प्रा. डॉ. बळीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. भारतासह अनेक देशांतील शास्त्रज्ञ, धोरणतज्ज्ञ, कायदेपंडित, अभ्यासक आणि संशोधक यांचा परिषदेतील सहभाग लक्षणीय ठरला.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिकारी संजय शिरसाट व हर्षदीप कांबळे (आयएएस), माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्रा. डॉ. बळीराम गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. भारतासह अनेक देशांतील शास्त्रज्ञ, धोरणतज्ज्ञ, कायदेपंडित, अभ्यासक आणि संशोधक यांचा परिषदेतील सहभाग लक्षणीय ठरला.
स्वप्नील खामकर यांनी सादर केलेल्या संशोधन प्रबंधात डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, कायदा आणि समता या विषयांवरील विचारांचा आजच्या जागतिक संदर्भात उपयोग कसा होऊ शकतो, यावर स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली. आंबेडकर विचारधारेचा आधुनिक विकास, युवापिढीवरचा प्रभाव आणि समाजपरिवर्तनासाठीची उपयुक्तता यांचा त्यांनी अभ्यासपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित विद्वान आणि मान्यवरांकडून विशेष दाद मिळाली.
स्वत:चा अनुभव सांगताना स्वप्नील खामकर म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे विचार जागतिक मंचावर मांडणे ही माझ्यासाठी केवळ वैयक्तिक अभिमानाची बाब नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या विचारांतूनच नव्या पिढीला नवसंजीवनी मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
या परिषदेतील विविध सत्रांमध्ये डॉ. आंबेडकर यांचे लंडनमधील शिक्षण, ग्रेज इन मधील कायद्याचा अभ्यास, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अर्थशास्त्राचे विचार, आणि रुपयाचा प्रश्न या त्यांच्या प्रबंधाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला प्रभाव यावर सखोल चर्चा झाली. परिषदेत सहभागी प्रतिनिधींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊस, लंडन येथे भेट देण्याची संधी मिळाली. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने त्यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा अनुभव घेतला.
स्वप्नील खामकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार संग्राम जगताप, माजी आमदार सिताराम घनदाट, आणि चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.