• Tue. Jul 22nd, 2025

युवान तर्फे यूपीएससी गुणवंतांचा गौरव

ByMirror

May 14, 2025

प्रशासकीय सेवेत अधिकारी होताना ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असावी -पद्मश्री पोपट पवार

प्रेरणादायी अनुभवकथन व यशाचा केला गुणवंतांनी उलगडा

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या मातीतून अधिकारी म्हणून घडलेले मुले आपल्या कार्यातून देशा समोर चांगले मॉडेल उभे करत आहेत. प्रशासकीय सेवेत अधिकारी होताना ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली असली पाहिजे, तेंव्हाव ग्रामीण भागाचा सर्वांगीन विकास साधता येणार आहे. स्वावलंबी गावातून राष्ट्रनिर्माण होणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.


यूपीएससी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून विशेष यश मिळवलेले ओंकार खुंटाळे, ज्ञानेश्‍वर मुखेकर, अभिजित आहेर या गुणवंतांचा युवानच्या वतीने पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. याप्रसंगी माजी प्राचार्य भास्करराव झावरे, ॲड. श्‍याम आसवा उपस्थित होते.


पुढे पद्मश्री पवार म्हणाले की, हिवरेबाजारचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवून विविध सरकारी योजना प्रभावीपणे राबवा. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होवून समाजाची परीक्षेत सर्वसामान्यांना न्याय देवून उत्तीर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन करुन पर्यावरण, गावातील विविध प्रश्‍नांची जाणीव त्यांनी करुन दिली.


सुरवातीस गायक गिरीराज जाधव यांनी गिटारवर प्रेरणा आणि देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. प्रास्ताविकात युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी युवानच्या सामाजिक व गरजू घटकांसाठी चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक चळवळीची माहिती दिली. प्रा. भास्करराव झावरे म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी वेदना सोसाव्या लागतात, चालत राहिले पाहिजे. प्रयत्नांची पायवाट मोठा रस्ता तयार करत असल्याचे स्पष्ट केले. ॲड. श्‍याम आसवा यांनी देश चांगला घडविण्यासाठी प्रशासन उत्तम असण्याची गरज विशद केली. युवान विद्यार्थिनी माधुरी ठाणगे, मंगेश गुंजाळ, ज्ञानेश्‍वर दराडे यांनाही स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमात गुणवंतांनी आपल्या यशाचा राजमार्ग उपस्थित विद्यार्थी आणि पालकांसमोर उलगडून दाखवला. ओंकार खुंटाळे यांनी युवान ग्रंथालयातून अभ्यासाची सुरवात केल्याचे आणि कधी काळी अशाच प्रेरणा कार्यक्रमात विद्यार्थी म्हणून समोर बसल्याच कृतज्ञतापूर्वक नमूद केले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी पदवी काळात विविध उपक्रमात सहभागी झाल्याचे स्वउदाहरणासह सांगितले.


ज्ञानेश्‍वर मुखेकर यांनी वाढती स्पर्धा परीक्षा लक्षात ठेऊन नवोदितांनी प्लॅन बी तयार ठेवण्याचे आवाहन केले. तसेच आर्थिक स्थैर्य दीर्घ तयारीच्या काळात तणाव कमी करण्याचे काम करतो. रँक सोबत तितकीच मोठी जबाबदारी खांद्यावर येत असल्याचे सांगितले. अभिजीत आहेर यांनी हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क अधिक कामी येत असल्याचे सांगितले. इंग्रजी, गणित आदीचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्‍वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे गेल्यास यश आपलेच असल्याचे नमूद केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांनाही यशवंतांनी समर्पक उत्तरे दिली. नगरकर गरजू विद्यार्थ्यांसाठी युवान मार्फत आम्ही नेहमीच मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहू असे आश्‍वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली भावे यांनी केले. आभार युवान विद्यार्थीनी दुर्गा तागड हिने मानले. वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी सुप्रिया मैड, वर्षा कुसळकर, सुरेश मैड आणि युवान विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *