तिरंगा फडकवून पेढे वाटप; भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणला
नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी परिसरात युवासेनेच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
युवासेनेने तिरंगा फडकावून परिसरात भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. देशप्रेमाचा उत्साह आणि लष्कराच्या शौर्याचे कौतुक करत अनेक कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, उद्योजक वैभव शेटिया, नरेश शेळके, अमित बारवकर, शंकर शेळके, वैभव सुरवसे, असलम इनामदार, हर्षवर्धन देशपांडे, अजिनाथ क्षीरसाठ, स्वप्निल खराडे आदींची उपस्थिती होती.
योगेश गलांडे म्हणाले की, दहशतवाद्यांनी पहलगाम येथे 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा जीव घेतला, ही घटना पूर्ण देशासाठी वेदनादायक आहे. भारतीय लष्कराने अत्यंत धाडसी आणि ठोस कारवाई करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले, त्यासाठी संपूर्ण देशवासियांना त्यांचा अभिमान आहे. लष्कराच्या कारवाईनंतर पाकिस्तान किंवा कोणत्याही दहशतवादी संघटना भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.