हनुमान चालीसा, मृत्यूंजय जाप व गायत्री मंत्रांनी मंदिर गुंजला
नगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. या प्रार्थनेत हनुमान चालीसाचे पठण, मृत्यूंजय जाप तसेच हनुमान अष्टक व गायत्री मंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले.
या प्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, सर्व विश्वस्त मंडळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मनोभावे अरुणकाकांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी देवाकडे साकडे घातले. पुणे येथील खाजगी रुग्णालयात अरुणकाका सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी शीख, पंजाबी व सिंधी समाजाने एकत्र येत प्रार्थना केली.
राकेश गुप्ता म्हणाले की, अरुणकाका हे सर्व नगरकरांचे भूषण आहेत. ते लवकरच बरे होवोत आणि पुन्हा एकदा सामाजिक कार्यात सक्रिय होतील, अशी सर्वांची आशा आहे. विविध धर्म, जातींच्या लोकांनी त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना फळदायी ठरणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.