दगड भेजा दूधाचा सत्याग्रहातून केली जाणार लोकजागृती
मद्यप्राशन वैयक्तिक व्यसन न राहता समाजघातक रोग बनले -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- दारुच्या व्यसनाने युवकांसह नवविवाहित दांम्पत्यांचे संसार उध्वस्त होत असताना पीपल्स हेल्पलाइनच्या पुढाकाराने मद्यपी विरोधात सत्याग्रह जारी करण्यात आला आहे. भारतात महात्मा गांधींनी 1930 मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध मिठाचा सत्याग्रह सुरू केला. त्याच प्रेरणेतून आजच्या सामाजिक संकटाविरुद्ध दगड भेजा दूधाचा सत्याग्रह उभा करण्याचा संकल्प संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
दारूच्या विळख्यात अडकलेल्या, विचारशक्ती गमावलेल्या आणि कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या मद्यपी प्रवृत्तीविरुद्ध हा सत्याग्रह राहणार आहे. दारूपानामुळे अनेक घरांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. कित्येक मुलांचे शिक्षण थांबले आहे. महिलांवर हिंसाचार वाढला आहे. संपूर्ण कुटुंबात भीती, दहशत आणि अश्रू यांचीच वर्दळ आहे. मद्यप्राशन हे केवळ वैयक्तिक व्यसन न राहता समाजघातक रोग बनले असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
दगड भेजा एक प्रतीकात्मक भाष्य व उपमा आहे. ज्या मेंदूची जी दारूपानामुळे अवस्था सुन्न झाली आहे, ज्याची निर्णयक्षमता गमावली आहे. अशा मेंदूला जागं करण्यासाठी आपुलकी, प्रेम आणि आरोग्यदायी पर्याय हाच उपाय आहे. दूधाचा सत्याग्रह नवा सामाजिक मार्ग असून, दूध हे केवळ आरोग्याचे प्रतीक नाही, तर तो शुद्धता, सर्जनशीलता आणि कुटुंबाच्या स्थैर्याचे प्रतीक आहे. दूधाचा सत्याग्रह म्हणजे रस्त्यावर दूध पाजणाऱ्या शिबिरांचे आयोजन,दारूच्या दुकानासमोर शांत, संयमी आंदोलन, व्यसनमुक्त झालेल्यांच्या प्रेरणादायी कथा, कुटुंब केंद्रित स्वराज्य संकल्पना पूर्ण कुटुंब स्वराज्य आमचा मंत्र स्वातंत्र्य केवळ राष्ट्रासाठी नको, तर प्रत्येक घरासाठी, प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक बालकासाठी हवे आहे. म्हणूनच या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या सत्याग्रहाच्या माध्यमातून गावोगावी लोकांना एकत्र करुन दारूमुक्त समाजाची शपथ दिली जाणार आहे. तसेच स्वरचित गीते, पोवाडे व लोकगीतांमधून जागृती केली जाणार आहे. समाजाला आज एका नव्या चळवळीची गरज असून, जी बाह्य शत्रू नव्हे, तर अंतर्गत विघातक प्रवृत्तीशी लढेल. दगड भेजा दूधाचा सत्याग्रह ही फक्त एक घोषणा नाही, ती एक सामाजिक जागरण आहे, एक कुटुंबक्रांती असल्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.