• Sat. Apr 19th, 2025

बिएसएनएल कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ByMirror

Apr 15, 2025

संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत विविध उपक्रमाचे आयोजन

बाबासाहेबांनी प्रतिशोध न घेता, न्याय आणि समतेच्या तत्त्वांवर संविधानाची निर्मिती केली -प्रदीप जाधव

नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती बीएसएनएल कार्यालय, अहिल्यानगर येथे बीएसएनएल व एससी-एसटी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत संविधानाची प्रत उपस्थितांना वाटप करण्यात आले.


प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणाने अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी बीएसएनएलचे महाप्रबंधक चोंगड कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यांच्यासह एससी-एसटी वेल्फेअर असोसिएशनचे मुख्य सल्लागार प्रदीप जाधव, उपमहाप्रबंधक प्रशासन विश्‍वनाथ वाघ, उपमहाप्रबंधक राशीनकर, जिल्हा सचिव गजेंद्र पिसे, फायनान्स ॲडव्हायझर झोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रदीप जाधव म्हणाले की, बाबासाहेबांनी असंख्य अपमान व अडचणी सहन करूनही, कधीही कोणताही प्रतिशोध न घेता, न्याय आणि समतेच्या तत्त्वांवर आधारित संविधानाची निर्मिती केल्याचे सांगितले. तर बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला.


महाप्रबंधक चोंगड यांनी अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबांचे विचार केवळ दलित-वंचितांसाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी दिशादर्शक असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, आपल्या संविधानात समतेची बीजे रोवणाऱ्या बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे.


यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्‍नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. ज्यात कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात पिंपरकर, जगताप, शिपनकर, वाघ आदी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जोशी, प्रशांत मेहरा, गौतम मिना, घोडके, अशोक पारधे, अनंतरे, प्रविण सोनवणे, कुलदीप सिंग, महिला वर्गातून वैशाली उदमले, मनीषा पिसे, शिला झेंडे, शिल्पा जावळे आदींसह बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पिसे यांनी केले. आभार थोरात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *