• Wed. Apr 16th, 2025

धम्माच्या प्रचारासाठी बुध्द रुप दान उपक्रम

ByMirror

Apr 15, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम

जिल्ह्यात धम्माचे फुल उमलत आहे -संजय कांबळे

नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील वाळूंज येथील सम्राट बुद्ध विहार आणि आलमगीर येथील जेतवन बुद्ध विहारात बुध्द रुप दान करण्यात आले. तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सम्राट ग्रुपच्या वतीने वाळूंज (ता. नगर) दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सव्वासाह फुटाचे बुध्द रुपाचा समावेश होता. मशाल प्रज्वलीत करुन या मिरवणुकीचे प्रारंभ झाले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील समाजबांधवांसह युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


संजय कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन संपूर्ण भारतात धम्मप्रसाराचा संकल्प केला. बाबासाहेबांनी नगर जिल्ह्याला काटेरी जिल्हा म्हटले होते. पण आज याच जिल्ह्यात धम्माचे फुल उमलत आहे, हे बाबासाहेबांच्या कार्याचे फळ आहे.


ते पुढे म्हणाले, अनेक गावांमध्ये बुद्ध विहार असूनही तेथे बुद्ध रुप नाही. म्हणून अशा ठिकाणी बुद्ध रुप दान मोहिम राबविण्यात येत आहे. ही केवळ प्रतिष्ठापना नाही, तर धम्माच्या जागृतीचे बीज रोवण्याचा प्रयत्न आहे. तथागत बुद्धिस्ट सोसायटी ही संस्था बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या उपक्रमामुळे वाळूंज व आलमगीर येथील धम्मस्थळी नवचैतन्य निर्माण झाले आहे. उपासक, उपासिकांनी या मूर्तीचे व उपक्रमाचे स्वागत केले. अशा उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व धम्मधारा घराघरांत पोहोचवण्याचे कार्य हाती घेण्यात येत आहे, आणि हे कार्य समाजप्रबोधनाच्या दिशेने भक्कम पाऊल ठरणार असल्याची भावना आंबेडकरी अनुयायींनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *