बाबासाहेबांनी उपेक्षितांना दिला सन्मानाने जगण्याचा अधिकार -सुनील साळवे
नगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत जय भीमचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला. तसेच आरपीआयच्या माध्यमातून तालुकास्तरावर देखील जयंतीनिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभिवादन कार्यक्रमासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, विजय भांबळ, आप्पासाहेब मकासरे, शिवाजी साळवे, भाऊसाहेब ठोंबे, गणेश कदम, आकाश पंचमुख, बापू जावळे, संजय डहाणे, सुमेध डहाणे, बंटी गायकवाड आदींसह आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुनील साळवे म्हणाले, आज संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते, हे त्यांच्या महात्म्याचे आणि विचारसंपत्तीचे प्रमाण आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांचा सखोल अभ्यास करून एक अशी राज्यघटना तयार केली जी सर्व धर्म, जाती, पंथ यांना समान अधिकार देणारी आहे. बाबासाहेबांनी बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वावर गरीब, श्रमिक, वंचित, दलित, महिलांना न्याय दिला. त्यांनी मताचा हक्क, शिक्षणाचा अधिकार, सन्मानाने जगण्याचे मूलभूत अधिकार घटनेतून बहाल केले. आजही देशातील संविधान टिकवण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी बाबासाहेबांचे विचारच आपल्याला दिशा देतात. समाजाच्या समतेसाठी आणि राष्ट्राच्या एकतेसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. युवापिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावेत आणि त्यांच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
आरपीआयच्या वतीने तालुकास्तरावर विविध ठिकाणी समाजजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. युवकांसाठी मार्गदर्शन सत्रे, संविधान वाचन, विचारमंच, तसेच दलित वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप यांसारख्या सामाजिक उपक्रमांनी बाबासाहेबांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यात आला.