जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समोर वाचला समस्यांचा पाढा
आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने नागरिकांचे निवेदन; नागरिकांच्या परिसरात दुकान स्थलांतर करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील महालक्ष्मी उद्यान ताठे मळा येथील रेशन दुकान क्रमांक 41 च्या दुकान चालकाचा समस्याचा पाढा वाचून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेले रेशन दुकान लाभार्थी नागरिकांच्या परिसरात स्थलांतर करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने प्रेमदान हडको मधील नागरिकांनी केली आहे.
प्रेमदान हडको परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे व तहसीलदार सपना भावे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी महिला जिल्हा चिटणीस अंबिका भिसे, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष स्मिता वाळेकर, महिला सरचिटणीस स्वाती पवार, सहसचिव भारती दिवटे, बाळासाहेब खताडे, विलास शिंदे, शंकर तुपे, भिमराव भगत, बिपिन जठार, पद्माकर गवळी, राहुल शहाणे आदींसह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेमदान हडको परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांचे रेशन दुकान क्रमांक 41 महालक्ष्मी उद्यान ताठे मळा येथे आहे. नगर-मनमाड रोड व बालिकाश्रम रोड हे रस्ते पार करून नागरिकांना एक ते दीड किलोमीटर अंतरावर जावून रेशनचे धान्य आणण्यासाठी जावे लागत आहे. सदर रेशन दुकान नागरिकांच्या वसाहतीपासून लांब असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
तसेच यावेळी महिला व नागरिकांनी दुकान चालकाची धान्य घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी सातत्याने अरेरावी सुरु असते, महिलांशी उद्धट वर्तन केले जाते, महिन्यातून फक्त एकदा दुकान उघडण्यात येते, दुकान कधी उघडणार व कधी बंद होणार याची माहिती दिली जात नाही, धान्य घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावाव्या लागतात, रांगेत उभे राहिले तरच रेशन धान्य देत असल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागते, दुकानात नियम फलक नाही, किती धान्य देणार कधी उघडणार याचे सूचनाफलक नसल्याची तक्रार जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी नागरिकांच्या तक्रारीवरुन सदर रेशन दुकानावर तपासणी करुन कारवाई करण्याचे व जवळच्या रेशन दुकानाला रेशनकार्ड धारक जोडून देण्याचे आश्वासन दिले.