राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
गतीरोधकांमुळे नागरिकांना सोयी ऐवजी त्रास होत असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महापालिका ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया दरम्यान चूकीच्या पध्दतीने टाकण्यात आलेले गतीरोधक त्वरीत हटविण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांना सदर मागणीचे निवेदन दिले. तर सदर गतीरोधक अपघातांना कारणीभूत ठरुन नागरिकांना सोयी ऐवजी त्रास होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, राष्ट्रवादी महिला जिल्हा चिटणीस अंबिका भिसे, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष स्मिता वाळेकर, महिला सरचिटणीस स्वाती पवार, सहसचिव भारती दिवटे, बाळासाहेब खताडे, विलास शिंदे, शंकर तुपे, भिमराव भगत, बिपिन जठार, पद्माकर गवळी, राहुल शहाणे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी नगर महामार्गावर बीटीआर व शासकीय विश्रामगृह जवळ असलेल्या गतीरोधकामुळे वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी, सामान्य नागरिक व महिलांना त्रास होत आहे. गतीरोधक चूकीच्या पध्दतीने शासकीय नियमांना डावलून उभारण्यात आलेले असून, यामुळे त्यांचा अंदाजा येत नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. तर या गतीरोधकामुळे अपघात होवून नागरिकांचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे म्हंटले आहे.
अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांनी सदर प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन सदर गतीरोधक नागरिकांच्या सोयीसाठी होते. मात्र त्यामुळे गैरसोय होत असेल, तर ते हटविणार असल्याचे आश्वासन दिले. सदर गतीरोधक तात्काळ न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.