• Wed. Jul 2nd, 2025

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील करियरच्या संधीबद्दल मार्गदर्शन

ByMirror

Mar 27, 2025

भाई सथ्था नाईट हायस्कूल व मासूम संस्थेचा उपक्रम; शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

स्वप्न साकारण्यासाठी मोठे कष्ट व संघर्षाचा सामना करावा लागतो -प्रा. शिरीष मोडक

नगर (प्रतिनिधी)- रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच भवितव्य घडविण्याच्या उद्देशाने भविष्यातील करियरच्या संधीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये मुंबई येथील मासूम संस्थेच्या वतीने रात्र शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी करियरवर मार्गदर्शन करुन भविष्यातील रोजगाराच्या विविध संधीची माहिती देण्यात आली. या व्याख्यानाला रात्र शाळेच्या युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दादा चौधरी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी, रात्र शाळेचे चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी, प्राचार्य सुनील सुसरे, प्रथमेश मकासरे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.


प्रा. शिरीष मोडक म्हणाले की, जिद्दीने कोणतेही काम केले की यश मिळतेच. विद्यार्थ्यांनी संघर्षातून आपले ध्येय गाठावे. कोणतेही स्वप्न साकारण्यासाठी मोठे कष्ट व संघर्षाचा सामना करावा लागतो. ध्येय निश्‍चित करुन त्या दिशेने योग्य मार्गक्रमण करण्याचे त्यांनी सांगितले.


सुमतीलाल कोठारी यांनी करियर निवडताना विद्यार्थ्यांनी आवड निवड जपावी. इतरांचे अनुकरण करुन आपल्या करियरच्या वाटा निवडू नये, आवड असलेल्या क्षेत्रात करियर केल्यास ते काम करताना एक आनंद निर्माण होतो व यश देखील मिळत असल्याचे सांगितले. प्रा. ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, कष्ट केल्यावर यश नक्की मिळते. यश मिळाल्यावर समाजाप्रती आपली जाणीव जागृक ठेवून इतर गरजूंना देखील मदतीचे त्यांनी आवाहन केले.


मासूम संस्था मुंबईचे करियर सेलचे प्रतिनिधी पॉल रेमेडीयस यांनी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी व पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करियरच्या संधीबद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, चाकोरीबध्द वाटेवर न जाता विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्राची निवड करुन त्या दिशेने वाटचाल करावी. ग्लोबल युगात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या असून, ते ओळखून त्यामध्ये करियर करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र विद्यार्थी पारंपारिक वाटेने जात असल्याने रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होत आहे. स्वत:मध्ये कौशल्य निर्माण करुन आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याचे त्यांनी सांगितले. तर करियरच्या निर्माण झालेल्या मोठ्या संधी विद्यार्थ्यांसमोर माहितीद्वारे खुल्या केल्या.


प्राचार्य सुनील सुसरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना रात्र शाळेत शिक्षणाबरोबर करियर घडविण्याचे कार्य देखील मासूम संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. अनेक विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली आहे. त्यांना समाजात सक्षमपणे उभे करण्याचे काम भाई सथ्था नाईट हायस्कूल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत गजेंद्र गाडगीळ यांनी केले. आभार महादेव राऊत यांनी मानले. करियर मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी, माजी कार्याध्यक्ष अनंत फडणीस, माजी चेअरमन डॉ. पारस कोठारी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजितशेठ बोरा यांनी शुभेच्छा दिल्या.



भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन
शुक्रवारी (दि.28 मार्च) रात्रशाळेसह समाजातील गरजवंत, बेरोजगार सर्व विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत हा रोजगार मेळावा होणार असून, यामध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना जागेवर प्लेसमेंट दिली जाणार आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होवून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *