ग्रामीण भागात चालविणार व्यसनमुक्तीची चळवळ
सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज -सुनील उमाप
नगर (प्रतिनिधी)- शहरासह ग्रामीण भागात युवक-युवतींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत चाललेले व्यसन रोखण्यासाठी काळजापार बहुउद्देशीय विकास संस्था संचलित व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. निरोगी व सक्षम निर्व्यसनी समाज घडविण्याच्या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची चळवळ चालविण्यात येणार आहे.
पारगाव मौला (ता. नगर) येथे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील उमाप यांच्या हस्ते या व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कविताताई नेटके, डॉ. सतीश काळे, डॉ. स्वाती काळे, डॉ. संतोष गिऱ्हे, पारगावचे सरपंच वैभव बोठे, अमोल खेडकर, प्रा. गोरख अमृत, शरदराव हिंगे, भिल्ल संघटनेचे अध्यक्ष अनिल बर्डे, रमेश नवगिरे, उषा काळे, वृषाली उमाप, गौरी नेटके, कलाबाई नेटके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुनील उमाप म्हणाले की, सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज बनली आहे. स्पर्धेच्या युगात युवक ताणतणाव व निराशेमुळे व्यसनाच्या आहारी जात आहे. कमी वयातच व्यसनाधिन झालेले युवक दिसत असून, व्यसनापासून युवकांना दूर करण्यासाठी जनजागृतीद्वारे मानसिकता बदलण्याची गरज आहे. काळजापार संस्थेने व्यसनमुक्तीसाठी उचललेले पाऊल प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या अध्यक्षा कविताताई नेटके म्हणाल्या की, एखाद्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला व्यसन लागल्यास त्यांचे संसार उघड्यावर येते. व्यसनामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत असताना वाढते व्यसनाचे प्रमाण रोखण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब नेटके यांनी तंबाखू व धुम्रपान करणार्या युवकांची संख्या अधिक आहे. फॅशन म्हणून युवक-युवती व्यसन करताना दिसत आहे. नशेच्या आहारी जाऊन युवा वर्ग आपले जीवन उध्वस्त करीत आहे. व्यसन फक्त श्रीमंत वर्गा पुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तरुण देखील यामध्ये ओढला गेला आहे. हे व्यसनमुक्ती केंद्र एक चळवळीच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.