एके क्रू आयोजित समर एक्झिबिशनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्याची गरज -शितल जगताप
नगर (प्रतिनिधी)- महिलांच्या विविध व्यवसायाला चालना देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महिला दिनानिमित्त एके क्रू च्या वतीने आयोजित समर एक्झिबिशनला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांनी आर्थिक सक्षम होवून बाजारपेठेत स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करण्याचा संकल्प केला.

इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात अंकिता बंग व भूमी बंग या युवतींनी महिलांसाठी घेतलेल्या या एक्झिबिशनचे उद्घाटन माजी नगरसेविका शितलताई जगताप, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, मनिषा भागानगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, दादी-नानी ग्रुपच्या उपाध्यक्षा उषा सोनी, अलका बंग, युवराज चरखा, सागर बंग, यश बंग, ईश्वर चरखा, ज्योती चरखा, आरती थोरात, सुरेखा भोसले, अरुणा गोयल, हेमा पडोळे, नंदा पुरोहित, रेखा फिरोदिया, लीला अग्रवाल, जयश्री पुरोहित, श्रद्धा उपाध्ये, राखी आहेर, डॉ. प्रिया ओव्हळ आदींसह महिला उपस्थित होत्या.
शितलताई जगताप म्हणाल्या की, महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महिला आर्थिक सक्षम झाल्यास कुटुंबाची प्रगती साधली जाणार आहे. महिलांच्या प्रगतीसाठी सर्वांनी पाठबळ देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर दोन युवतींनी महिलांसाठी घेतलेल्या या एक्झिबिशनचे त्यांनी विशेष कौतुक केले.
अंकिता बंग म्हणाल्या की, महिलांनी स्वबळावर छोटा-मोठा व्यवसाय उभा केला आहे. त्या व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एके क्रू समर एक्झिबिशनला शहरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात खेरेदी-विक्री होऊन आर्थिक उलाढाल झाली. प्रदर्शनात खास महिलांसाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध फॅशनेबल कपडे, साड्या, घरगुती सजावटीचे सामान, ज्वेलरी, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या महिलांची डॉ. प्रिया ओव्हाल यांनी मोफत दंत तपासणी केली.