चंद्रकांत उजागरे यांनी मांडले शहरातील समाजाचे प्रश्न
समस्त ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट
नगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय आहे. ख्रिश्चन मिशनरी सेवा संस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देत असून, या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची भावना काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
बुलढाणा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व समस्त ख्रिस्ती समाज महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सतीश (दादा) मेहेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ख्रिस्ती समाजाच्या राज्यातील शिष्टमंडळाने काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांचा समस्त ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी यांच्या वतीने अहमदनगर ह्युम मेमोरियल चर्चचे विश्वस्त चंद्रकांत उजागरे यांनी त्यांचा सत्कार केला.
गेल्या काही दिवसापासून अल्पसंख्यांक समाजातील काही घटकांना विशेषतः ख्रिस्ती समाजाला आणि धर्माला जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. समाज माध्यमातून होणाऱ्या चिथावणीखोर भाषणामुळे आणि लेखनामुळे समाज चिंताग्रस्त आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील दिवसेंदिवस होत असलेले पीछेहाट समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित स्वतंत्र महामंडळाची मागणी, काँग्रेस कमिटीमध्ये ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात समस्त ख्रिस्ती समाजाचे राज्याचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी सविस्तर चर्चा घडवून आणली.
ॲड. प्रकाश संसारे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उजागरे, अनिल भोसले, प्रवक्ते प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे आदींनी ख्रिस्ती समाजाची सद्यपरिस्थिती व ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात बैठकीत आग्रही मागणी केली. सपकाळ यांनी अतिशय काळजीपूर्वक समाजाच्या भावना समजून घेऊन काँग्रेस पक्ष सदैव ख्रिस्ती समाजाच्या पाठीशी उभा राहील असे आश्वासन दिले. या बैठकीमध्ये आर.सी. गावीत, जयंत पाडवी, दीपक चंद्रशेखर, अनिल आगलावे आदींसह ख्रिस्ती समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.