• Fri. Mar 14th, 2025

निवडणूक आयोगाच्या शक्तीवर निवडून आलेली ही राजसत्ता -तिस्ता सेटलवाड

ByMirror

Mar 2, 2025

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शहरात दहावा स्मृतिदिन साजरा

कॉम्रेड सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान

नगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वसमावेशक विशाल आंदोलन उभे राहिले. मात्र स्वातंत्र्यानंतर सामूहिक राष्ट्रवाद तोडण्याचे काम धर्मांध शक्ती करत आहे. पैशाच्या बळावर चालणारी लोकशाही आणि संविधानिक मार्गाने चालणारी लोकशाही यामध्ये मोठा फरक आहे. नागरिकांनी निवडलेली ही राजसत्ता नसून, निवडणूक आयोगाच्या शक्तीवर निवडून आलेली ही राजसत्ता असल्याचा आरोप मानव अधिकार कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकार तिस्ता सेटलवाड यांनी केला. तर संविधानिक हक्क, अधिकारासाठी गप्प बसण्याचे सोडून, प्रश्‍न उपस्थित करण्याचे आवाहन त्यांनी केले.


शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील प्रोफेसर चौक येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती व्याख्यान व स्मृती प्रबोधन पुरस्कार समारंभाप्रसंगी सेटलवाड बोलत होत्या. नांदेड व लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे, कॉ. ॲड. बन्सी सातपुते, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, आर्किटेक्ट अर्शद शेख, कॉ. संतोष खोडदे, डॉ. बापू चंदनशिवे, कॉ. बाबा आरगडे, भगवान गायकवाड, आप्पासाहेब वाबळे, लक्ष्मण नवले, भारती न्यालपेल्ली, बबनराव सालके, आनंद शितोळे, अशोक सब्बन, संध्या मेढे, ॲड. सुभाष भोर, किसनराव लोटके आदींसह भाकप, आयटक, प्रगतशील लेखक संघ, पीस फाउंडेशन व डाव्या पुरोगामी विचारांच्या संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजची राजकीय परिस्थिती व लोकशाहीचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन करताना सेटलवाड म्हणाल्या की, संविधानाची मुल्ये पायदळी तुडवून नागरिकांच्या विरोधात कायदे तयार केले जातात. राजसत्तेने मीडिया ताब्यात घेतली आहे. ही मीडिया जातीयवादाला खतपाणी घालत आहे. धार्मिक प्रश्‍न उपस्थित करून शेतकरी, साखर कामगार, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रासह विविध जिव्हाळांच्या प्रश्‍नांपासून दुर्लक्षीत केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या राजसत्तेला अधिकार मागणारे नागरिक नको असून, भिक मागणारे नागरिक पाहिजे आहे. समाजात धार्मिक द्वेषाचे विष पेरले जात आहे. संविधान विरोधी शक्तींना तोंड देण्यासाठी नागरिकांना आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी प्रश्‍न उपस्थित करावे लागणार आहे. होत असलेल्या अन्याय, अत्याचार विरोधात गप्प बसणे सोडण्याचे आवाहन सेटलवाड यांनी केले. तर जनतेला सामूहिक पद्धतीने आवाज उठवावा लागणार आहे. सर्वजण गप्प बसल्यास अन्याय विरोधात आंदोलन उभे राहणे थांबतील, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.


जेष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुलाबाई आदमाने यांना कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्काराने उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच भाकप पक्षावर पुणे विद्यापिठाला शोधनिबंध सादर करुन जिल्ह्यातील कम्युनिस्टांच्या चळवळीचे विशेष टप्प्यांचा इतिहास मांडून पीएचडी मिळवणारे शिर्डी येथील सौ.प्रा. डॉ. शितल धरम आणि प्रा. डॉ. गणेश विधाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


प्रास्ताविकात बन्सी सातपुते यांनी कॉम्रेड पानसरे ही फक्त भाकपची मालमत्ता नसून, शोषित विरहित समाजव्यवस्था निर्माण व्हावी असे ज्यांना वाटते अशा सर्व बदल स्वीकारणाऱ्यांचे ते नेतृत्व आहे. शाहू, फुले, आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचा विचार पुढे घेऊन जाणे म्हणजे गोविंद पानसरे यांच्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासारखे आहे. सरकार विरोधात बोलले, तर देशद्रोही ठरविले जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी कुलगुरु सर्जेराव निमसे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांवर कोणाचाही नियंत्रण राहिलेले नसून, विरोधक हताश झाले आहे. स्थिर सरकार असले तरी गर्वनिष्ठ सरकार घटनेत बसत नाही. समाजकारण, राजकारणात जात, धर्म असू नये! धर्माचा सामाजिक जीवनाशी संबंध असता कामा नये, मात्र प्रयागराज ते आपल्या जिल्ह्यातील मढी पर्यंत धर्मांधतेने संविधानाची मूल्य पायदळी तुडविण्यात आली आहे. एकीकडे टोकाची बेकारी, मुलांचे लग्न होत नाही, यावर तोडगा काढण्याऐवजी त्यांचे माथी भडकवली जात आहे. शिक्षण क्षेत्रात देखील भ्रष्टाचार सुरू झाल्याने गुणवंतावर अन्याय होत आहे. भ्रष्टाचार टोकाला पोहोचल्याने सर्वसामान्यांची पिळवणुक होत आहे. देशाच्या विकासाचे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. विकसित भारताचे स्वप्न पाहताना शंका उपस्थित होत आहे. लोकशाहीच्या भविष्यासाठी पत्रकारितेचा चौथा स्तंभ बळकट होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अन्यथा देशात फॅसीझमचा शिरकाव झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.


सुभाष लांडे म्हणाले की, चळवळी बरोबर प्रबोधन व्हावे, हे सातत्याने पानसरे यांचे विचार होते. त्याच विचाराने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. समाजात उजव्या शक्ती दुही निर्माण करत आहे. यासाठी प्रबोधनाची गरज आहे. झुंडशाही राबवून सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात धर्माधर्मात तेढ पसरवून दूषित वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. घटनेने निवडून आलेले आमदार देखील घटने विरोधात कृत्य करून समाजाचे वाटोळे करायला निघाले आहेत. धर्मांधशक्ती विरोधात एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले.


सत्काराला उत्तर देताना सुलाबाई आदमाने यांनी पानसरे यांच्या कार्यकाळातील आठवणी सांगून, सरपंच असताना पाणी प्रश्‍न, एमएसईबीत डीपीसाठी केलेले आंदोलनाचा संघर्ष सांगितला. ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे असल्याचा प्रश्‍न उपस्थित करून, लोकशाही राज्यात शासन जन मताप्रमाणे वागत नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खोडदे यांनी केले. आभार बापू चंदनशिवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *