राज्यव्यापी अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण;
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आरक्षणाची वर्गवारी करावी -सुनिल शिंदे
नगर (प्रतिनिधी)- क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुणे येथील दशभूजा मैदानावर 1 मार्च रोजी होणाऱ्या लहूजी शक्तीच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोस्टरचे अनावरण करुन सर्व मातंग समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, कार्याध्यक्ष राजाराम काळे, पाथर्डी तालुका अध्यक्ष सिताराम शिरसाठ, जयवंत गायकवाड, सुनील सकट, किरण कनगरे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले की, 40 वर्षांनंतर मातंग समाजाचे अधिवेशन पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन 1 मार्च रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षणाची अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाणार आहे. वर्गवारी आरक्षणासाठी संघटनेने सातत्याने आंदोलन, उपोषण व न्यायालयीन मार्गाने लढा यशस्वी केला आहे. त्याला अंतिम यश येण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.