गोपनीय अहवालाची सत्यप्रत मिळवण्याची मागणी रिपाईची मागणी
मर्जीतील लोकांना अनाधिकृत जागेवर घरकुल मंजूर केल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत दरेवाडीतील ग्रामसेवकांच्या अनागोंदी कारभारामुळे घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तर याप्रकरणी ग्रामसेवकाच्या कार्यकाळातील अनागोंदी कारभाराची चौकशी करून संबंधित गोपनीय अहवालाची सत्यप्रत उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
या मागणीचे निवेदन रिपाईच्या शिष्टमंडळाच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी रिपाई ओबीसी सेलचे विजय शिरसाठ, गुलाम शेख, आदिल शेख, जमीर सय्यद, शहाबाज शेख आदी उपस्थित होते.
नगर तालुक्यातील दरेवाडी गावातील घरकुल योजनेच्या अंतर्गत ग्रामसेवकांनी कोणतीही खात्री न करता, त्यांच्या मर्जीतील लोकांना अनाधिकृत जागेवर घरकुल बांधण्यासाठी शासनाचे पैसे चेक देऊन वाटप केले. यामध्ये खाजगी जागेमध्ये घरकुल योजना राबविण्यात आलेली असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आलेला आहे.
या कार्यवाहीला वरिष्ठ अधिकारी देखील पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यामुळे ग्रामसेवकाच्या चुकीच्या कृत्याचा भांडाफोड होण्यासाठी गोपनीय अहवालाची मागणी करण्यात आलेली आहे. सत्यप्रत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.