गस्त वाढविण्याचे पोलीस प्रशासनाचे आश्वासन, सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने वाळकी (ता. नगर) येथे ग्रामस्थांसोबत बैठक घेण्यात आली. गावातील स्थानिक पातळीवरचे तंटे गावातच सोडविण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे आवाहन करुन, विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गुन्हेगारी रोखण्याच्या बाबतीत मार्गदर्शन केले. सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी सांगितली आणि छोट्या मोठ्या तंट्यांना गावातच सोडवण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट केले. वाढत्या भुरट्या चोऱ्या आणि लुटमारीच्या घटनांवर पोलिस लक्ष देणार असून, रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराचे स्वागत करुन, वाळकी ग्रामस्थांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचा सत्कार केला. तर पोलिस प्रशासनाच्या कार्याला पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. वाळकीतील पुरातन महादेव मंदिराच्या सभामंडपात झालेल्या बैठकीस मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.