पीपल्स हेल्पलाइनचा दावा
एकात्म ज्ञानक्रांती संपूर्ण मानवजातीला नवीन चेतनेच्या दिशेने घेऊन जाणार -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणाऱ्या सत्तापेंढारींचा अंत एकात्म ज्ञानक्रांती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) उदयानंतर होणार असल्याचा विश्वास पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यानंतर भारतात आणि जगभरात लोकशाही व्यवस्था रुजली, पण अनेक ठिकाणी ही व्यवस्था सत्तापेंढारी लोकांच्या हातात गेली. सत्तेची, संपत्तीची आणि प्रतिष्ठेची लालसा बाळगणारे हे लोक लोकहिताच्या नावाखाली फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात. अशा लोकांनी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थांना गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकवून ठेवले आहे. या व्यवस्थेमुळे सामान्य माणसाला न्याय, ज्ञान आणि स्वावलंबन मिळणे कठीण झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
एकात्म ज्ञानक्रांतीचा स्फोट:एकात्म ज्ञानक्रांती ही मानवी इतिहासातील नवा अध्याय ठरू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही संपूर्ण जगाला एकत्र जोडणारी आणि सत्यज्ञानाचा प्रसार करणारी यंत्रणा ठरेल. ज्यांना हे ज्ञान आत्मसात करता येईल, ते स्वतःला स्वयंपूर्ण बनवतील. पण जे या ज्ञानाच्या प्रवाहापासून दूर राहतील, ते कालबाह्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
एआयमुळे सामान्य माणसालाही जगभरातील ज्ञान आणि सत्य सहज उपलब्ध होईल. त्यामुळे सत्तापेंढारींच्या फसव्या घोषणा आणि त्यांच्या खोट्या वागणुकीला तोंड फुटेल. लोक स्वविचाराने निर्णय घेऊ लागतील आणि अशा स्वार्थी नेत्यांना नाकारतील.निसर्गपीठ सारख्या संकल्पनांमुळे लोकांना स्वतःच्या कष्टातून आणि ज्ञानातून स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळेल. जसे रेन गेन बॅटरी शेतकऱ्यांना जलसंधारण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य उपयोग करण्यास शिकवेल, तसेच लोक सरकारवर किंवा नेत्यांवर अवलंबून राहणार नाहीत. जे लोक या ज्ञानक्रांतीपासून दूर राहतील, ते आपोआपच प्रवाहाबाहेर जातील. अशा लोकांना स्वतःच्या अज्ञानामुळे सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडता येणार नाही. एकात्म ज्ञानावर आधारित नेतृत्व: सत्तापेंढारींच्या जागी अशा नेत्यांचा उदय होईल जे एकात्म ज्ञान, उच्च चेतना आणि स्वार्थत्याग यांवर आधारित असतील. हे नेते लोकहिताला प्राधान्य देतील गुलामगिरीतून मुक्त कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एकात्म ज्ञान लोकांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करतील. लोक स्वतःच्या ज्ञानावर आणि नैतिकतेवर आधारित निर्णय घेऊ लागतील. निसर्गपीठ आणि रेन गेन बॅटरीसारख्या साधनांमुळे मानवाला निसर्गाशी सुसंवाद साधण्याची आणि त्याच्या नियमांशी जुळवून घेण्याची संधी मिळेल. पर्यावरणीय संतुलन राखत, जगाला टिकवून ठेवण्याचे प्रयत्न होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ॲड. कारभारी गवळी यांनी डायनासॉरच्या नाशाने पृथ्वीवर एक नवे युग आणले, तसाच बदल आज एकात्म ज्ञानक्रांती घडवून आणणार आहे. सत्तापेंढारींचा अंत होईल आणि एक नवे युग सुरू होईल, जिथे ज्ञान, नैतिकता आणि निसर्गाशी सुसंवाद यांचा विजय होईल. ही क्रांती फक्त व्यवस्थापनाचा बदल नव्हे, तर मानसिकता बदलणारी असेल जी संपूर्ण मानवजातीला नवीन चेतनेच्या दिशेने घेऊन जाणार आहे. स्वयंपूर्ण मानवता आणि निसर्गाशी एकरूप जीवनाचा हा या युगाचा आधारस्तंभ ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.