शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- प्रजासत्ताक दिनी पंजाब मधील अमृतसर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन सदरील समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. वारंवार बाबासाहेबांचा पुतळा व संविधानाच्या विटंबनेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देखील या घटनेचा निषेध नोंदवून, आंबेडकरी समाजाच्या सदर मागणीला पाठिंबा दिला.
प्रजासत्ताक दिनी अमृतसर मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शिडीच्या सहाय्याने चढून एका समाजकंटकाने हातोड्याचे साहाय्याने सदर पुतळा फोडण्याचे कृत्य केले. सदर आरोपीला पोलिसांनी पकडले असून, त्याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्य व केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे कायदा करुन देशातील महापुरुषांचा अवमान व विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतुद केल्यास अशा प्रवृत्तींना लगाम लागणार आहे. देशात सातत्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व संविधानाची विटंबना होत आहे. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हेतू हा राजकीय भाग असल्याचे आंबेडकरी समाजाला जाणवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी परभणीत सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. त्या ठिकाणी सुद्धा मोठी दंगल झाली. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा बळी गेला, अद्यापि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वारंवार बाबासाहेबांच्या पुतळ्याची व संविधानाच्या विटंबनेच्या मागील मास्टरमाइंड शोधण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अमृतसर येथे घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. बाबासाहेब एका जाती धर्माचे नसून, सर्व धर्मीयांचे व समाजाचे आहे. संविधान देशातील सर्व समाजासाठी आहे. त्यांच्या पुतळ्याची विटंबना होत असताना कोणताच राजकीय पुढारी पुढे येऊन निषेध नोंदवत नाही, तर ज्या समाजाला त्यांच्यामुळे आरक्षण मिळाले ते समाज देखील गप्प आहेत. इतर देशांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले जातात, मात्र आपल्या देशातील त्यांचे पुतळे असुरक्षित आहेत. स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर देखील जातीयता संपलेली नसल्याची भावना आंबेडकरी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी सदर घटनेच्या चौकशीसाठी कमिटी नेमून अमृतसर व परभणी येथील घटनेच्या मागे कोण मास्टर मार्इंड आहे? याचा तपास करावा, महापुरुषांच्या पुतळ्याचे विटंबन करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.