• Thu. Oct 16th, 2025

मागासवर्गीय व्यक्तीची शहरातील जागा बळकाविणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा

ByMirror

Jan 26, 2025

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी

दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत जागा नावावर करुन घेतल्याचा आरोप

गर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय व्यक्तीला दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत, माळीवाडा येथील मोक्याची जागा बळकाविणाऱ्यांवर फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने करण्यात आली आहे. खरेदीखतावर नमुद केल्याप्रमाणे मुळ जागामालकास कोणत्याही प्रकारची रक्कम देण्यात आलेली नसून, ज्या बँकेचे चेक दाखविण्यात आले त्यापैकी एकाचे बँकेत खातेच नसून, तर एकाला चेक बुक दिले नसल्याचा खुलासा बँकेने केलेला असताना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाईने लावून धरली आहे.


यासंदर्भात रिपाईच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, तक्रारदार सुदाम भिंगारदिवे, अविनाश भोसले, गणेश कदम, शिवाजी साळवे आदी उपस्थित होते.


शहरातील माळीवाडा येथे 8/11 हे 0.22 क्षेत्र बाळू मारुती भिंगारदिवे यांच्या नावावर होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याने वडिलांना दारू पाजून केशव ढवळे (बाणेर, जि.पुणे) व प्रसाद जोगदंड (बीड) यांनी 13 जुलै 2013 रोजी खरेदी करून घेतलेल्या खरेदीखताप्रमाणे कोणत्याही प्रकारची रक्कम देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांचा मुलगा सुदाम भिंगारदिवे यांनी केला आहे.


खरेदी खताप्रमाणे 24 लाख रुपये इतकी रक्कम अदा केल्याची दाखविण्यात आली आहे. खरेदी देणाऱ्या व्यक्तीला रोख अथवा चेक स्वरूपात कोणतेही रक्कम मिळालेली नाही. सदरील लेखी पत्राद्वारे 23 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन येथे फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दिलेला होता. त्यावरून कोतवाली पोलीसांनी याबाबत चौकशी केली असता, प्रसाद जोगदंड यांचे कोथरूड बँक व राजगुरू सहकारी बँक (शाखा शिरूर) या बँकेत खाते नाही. तसेच केशव ढवळे यांचे बँकेत खाते आहे, परंतु बँकेने यांना चेक बुक दिलेला नसल्याचे माहिती बँकेने दिली आहे.


त्यामुळे या प्रकरणात सदरील क्षेत्राची सातबारा उतारावर लागलेली फेर क्रमांक नोंद रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दावा दाखल करण्यात आलेला आहे. सामनेवाला यांनी पोलीसां समोर भरवसा देवून सदरील जागा ही तुमच्या नावे खरेदी खताने पलटून देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु जागा आमच्या खरेदी खताने पलटून न देता सामनेवाले यांनी शहरातील दोन हॉटेल व्यावसायिकांना खरेदी दिली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


या प्रकरणात खरेदीची कोणतीही रक्कम न देता फसवणुकीने स्वत:च्या नावावर जागा करुन घेणाऱ्यांवर फसवणुकीसह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अप्पर पोलीस प्रशांत खैरे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल होण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे.



या प्रकरणात फसवणुकीने मागासवर्गीयांच्या जागा नावावर करुन घेणाऱ्या व्यक्तींचे इतर देखील तक्रारी आहेत. त्यांनी मागासवर्गीयांच्या जमीनी हडपण्याचा धंदा सुरु केलेला आहे. यांच्या तक्रारीचा सर्व दस्त करुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार आहे. जो पर्यंत अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल होत नाही, तो पर्यंत रिपाई मागे हटणार नाही. -सुनिल साळवे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *